भुयारी मोरी ठरतेय डोकेदुखी

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकासमोरील बाजूला असलेल्या डायमंड सोसायटीच्या आवारातील रेल्वेचा भुयारी मार्ग परिसरातील स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पावसाळ्यात या मोरीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याने, स्थानिक नागरिक गणेश कडव यांच्या घरात पाणी शिरून त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे भिवपुरी रोड रेल्वे स्टेशन व्यवस्थापक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे त्यांच्याकडून बोलले जात आहे.
या भुयारी मोरींची अद्याप साफसफाई देखील करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुढे मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे पाण्यासह या मोरीतील घाण गणेश कडव यांच्या घरात शिरणार हे त्रिवार सत्य आहे. रेल्वे प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कडव कुटुंबाला मानसिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वेने येथे नवीन मोरी टाकण्याचे काम हाती घेतले होते. त्यासाठी लागणाऱ्या सिमेंटच्या मोठ्या मोऱ्या आणून टाकण्यात आल्या आहेत. मात्र, त्या मोऱ्या जागेवर बसवण्याचे काम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. “रेल्वेने सिमेंट मोऱ्या आणून टाकल्या खऱ्या, पण त्या बसवणार कधी?“ असा संतप्त प्रश्न स्थानिक नागरिक गणेश कडव यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, पावसाळा तोंडावर आलेला असताना रेल्वे प्रशासनाचा हा संथ कारभार स्थानिक रहिवाशांच्या जीवावर उठणारा ठरत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी किंवा लोकांच्या घरात पाणी शिरून नुकसान होण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने तात्काळ या मोऱ्या बसवून पाण्याचा निचरा करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Exit mobile version