| पुणे | वृत्तसंस्था |
पुणे इथे पोलीस भरतीसाठी गेलेल्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मंगळवारी (दि.3) सप्टेंबर रोजी ही दुर्घटना घडली. टिप्परच्या धडकेत या तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरती नागरे असे मृत तरुणीचे नाव आहे. 3 सप्टेंबर रोजी आरती पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी जात असताना हा अपघात झाला. ती मूळची आष्टी तालुक्यातील रहिवासी आहे. दोन दिवस आधीच ती आपल्या भावाकडे पुण्यात परीक्षेसाठी राहिली होती. ज्यामुळे तिला परीक्षेत कोणताही अडथळा येऊ नये आणि यशस्वीरित्या ती पार व्हावी अशी स्वप्न उराशी बाळगून ती आली होती. लेखी परीक्षेसाठी मंगळवारी दुपारी हॉल तिकीटाची झेरॉक्स काढण्यासाठी दुचाकीवरुन जात असताना वाघोलीहून येणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिली. टिप्पर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. दुचाकीला पाठीमागून धडक बसल्याने आरतीचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरतीचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी टिप्पर चालकाला अटक केली आहे. तानाजी मुरकुटे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरती ही कबड्डी खेळाडू होती. राष्ट्रीय स्तरावर ती कब्बडी खेळली होती. स्पोर्ट्स कोट्यातून ती पोलीस भरतीतून प्रयत्न करत असताना ही दुर्दैवी घटना घडली आणि आरतीच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.