हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर आढळला अनोळखी मृतदेह

महाड परिसरातून वाहून आल्याचा संशय

​। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।

श्रीवर्धन तालुक्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथील एमटीडीसी (MTDC) बीच परिसरात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या आठवड्यात संपूर्ण रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसात आणि वादळात हा मृतदेह महाड परिसराकडून नदीपात्राद्वारे समुद्रात आणि तिथून पुढे हरिहरेश्वर किनारपट्टीवर वाहून आला असावा, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, हरिहरेश्वर येथील एमटीडीसी रिसॉर्ट जवळील समुद्रकिनाऱ्यावर स्थानिक नागरिकांना एक मृतदेह किनाऱ्यालगत अडकलेल्या अवस्थेत दिसून आला. नागरिकांनी तत्परता दाखवत या घटनेची माहिती श्रीवर्धन पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळताच श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या व जीवरक्षकांच्या मदतीने मृतदेह समुद्राबाहेर काढून त्याचा पंचनामा केला.

​’महाड कनेक्शन’चा पोलिसांना संशय
​गेल्या आठवड्यात महाड आणि परिसरात ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस झाला होता, तसेच जोरदार वादळही आले होते. या पूरपरिस्थितीत महाड किंवा आसपासच्या परिसरात एखादी व्यक्ती नदीच्या पुरात वाहून गेली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाड येथील सावित्री नदीचे पाणी थेट बाणकोटच्या खाडीतून समुद्राला मिळत असल्याने, हा मृतदेह महाडकडून समुद्राच्या प्रवाहासोबत वाहत हरिहरेश्वर किनाऱ्याला लागला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

​मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. सद्यस्थितीत हा मृतदेह ओळख पटवण्यासाठी श्रीवर्धन येथील शासकीय रुग्णालयाच्या शवगृहात सुरक्षित ठेवण्यात आला आहे. या मृत व्यक्तीबाबत कोणाकडेही काही माहिती असल्यास किंवा गेल्या काही दिवसांत आसपासच्या परिसरातून एखादी व्यक्ती बेपत्ता झाली असल्यास, त्यांनी तातडीने खालील क्रमांकावर श्रीवर्धन पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version