केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवालांची जेएनपीएला भेट

| चिरनेर | प्रतिनिधी |

बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी भारताच्या सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या बंदर जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी जेएनपीएला गुरुवारी 22 ऑगस्ट रोजी भेट दिली. या भेटीत त्यांच्या हस्ते जेएनपीए प्राधिकरण परिसरातील तीन सरोवरांच्या सौंदर्यवर्धन व पुनरुज्जीवन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बंदरातील विविध पायाभूत सुविधा व विकास प्रकल्पांचा आढावा घेतला.

याप्रसंगी प्राधिकरणाचे अध्यक्ष उन्मेश शरद वाघ यांनी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचे स्वागत केले. दरम्यान, जेएनपीए प्राधिकरणाच्या पर्यावरणीय शाश्‍वतेच्या प्रतिबद्धतेवर प्रकाश टाकत, मंत्र्यांनी बंदराच्या परिसरातील तीन महत्त्वपूर्ण जलाशयांचे उद्घाटन केले. यामध्ये प्रशासन इमारत पायथ्याचे सरोवर आणि सीपीपी सरोवरांचा समावेश आहे. दरम्यान, मंत्री महोदयांनी जसखार सरोवराच्या भूमीपूजनाचादेखील शुभारंभ केला. या सरोवरांना महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्‍वर, संत एकनाथ, आणि संत नामदेव महाराज या महान संतांच्या नावाने ओळखले जाते. दरम्यान, स्मार्ट सेझ प्रकल्पाच्या भूमीपूजनाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. एकंदरीत, जेएनपीए प्राधिकरण राष्ट्रीय आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी, व्यापार सुलभ करण्यासाठी आणि जागतिक पुरवठा साखळींमध्ये आपली भूमिका मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

Exit mobile version