| सुधागड-पाली | वार्ताहर |
पाली- खोपोली राज्य महामार्गावर अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहराजवळ मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका आहे. मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे अखेर नागरिकांनी याकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवार (दि. 7) अनोखे आंदोलन केले. रस्त्याजवळ खड्ड्या जवळ उभे राहून हातामध्ये विविध वाक्य लिहिलेले फलक या नागरिकांनी शासनाचा निषेध केला.
या फालकांवर लिहिले होते की, रस्ता माझा हक्क आहे, पण खड्डा नाही, मत मागतांना जी वचने दिली जातात ती खड्ड्यामध्ये बुजली जातात कायमची, खड्डा दिसतो पण जबाबदार कोण आहे ते दिसत नाही, हे आमचे पाली शहर आहे, जिथे रस्त्यातील खड्डे तुमचे स्वागत करतात अशी वाक्य असलेली फलक हातात धरून नागरिक खड्ड्याजवळ रस्त्यावर उभे होते. हे अनोखे आंदोलन पाहून येणारी जाणारी लोक आवर्जून येथे थांबत होती आणि संबंधित प्रशासनाच्या नावाने संताप व्यक्त करत होती.
दररोज हजारो वाहने या मार्गावरून प्रवास करतात. येथील विशेषतः बिकानेर मिठाईच्या दुकानासमोरील खड्डे आणि विक्रम स्टँडच्या समोरील खड्डे हे मोठ्या प्रमाणावर वाढले असून, या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार व चारचाकी वाहन चालकांना वेग कमी करून सावधगिरीने मार्गक्रमण करावे लागत आहे. अनेकदा अचानक ब्रेक लावल्याने मागील वाहनांची धडक लागण्याचा धोका निर्माण होतो. मात्र खड्डे न दिसल्याने यामध्ये अनेक वाहने जोरात आदळतात. दुचाकीस्वारांची तर मोठी गैरसोय होते. नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना हे आंदोलन करावे लागले. यावेळी आंदोलन करताना तुषार ठोंबरे, अमित निंबाळकर, कपिल पाटील व प्रवीण पालकर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एमएसआरडीसीचे दुर्लक्ष
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हे खड्डे बुजवणे अत्यंत आवश्यक आहे. पावसाच्या पाण्यामुळे हे खड्डे अधिक खोल होऊन मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. मात्र, एमएसआरडीसी या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.