एकजूट व्हा, युती सरकार घालवा- जयंत पाटील

। अलिबाग । प्रतिनिधी ।

शेतकरी कामगार पक्ष व काँग्रेस पक्षातील मंडळी वेगळी भूमिका घेऊन काम करणारी आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज एका विचाराचे पक्ष एकत्र आले आहेत. या निवडणुकीत चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. युतीचे सरकार घालविण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. एक वेगळ्या पद्धतीने काम करून पुन्हा आघाडीच्या विरोधात उभे राहण्याची हिंमत नाही झाली पाहिजे, असे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी शुक्रवारी (दि. 8) केले.

महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या प्रचारार्थ अलिबागमधील काँग्रेस भवनमध्ये तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक शुक्रवारी घेण्यात आली. यावेळी जयंत पाटील बोलत होते. यावेळी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे, नृपाल पाटील, काँग्रेसचे राज्य प्रदेश सचिव अ‍ॅड. प्रवीण ठाकूर, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश नाईक, रवींद्र उर्फ काका ठाकूर, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील थळे, अ‍ॅड. उमेश ठाकूर, रविना ठाकूर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भास्कर चव्हाण, योगेश मगर आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी जयंत पाटील म्हणाले की, विधिमंडळात काँग्रेसच्या बाजूने शेतकरी कामगार पक्षाची भूमिका कायमच राहिली आहे. राज्याच्या विधानसभेमध्ये अलिबागच्या आमदाराची एक वेगळी ओळख आहे. काँग्रेससह शेकापच्या अनेक दिग्गज मंडळींनी आमदार म्हणून विधानसभेत काम केले आहे. परंतु, त्यांचा एक वेगळा विचार होता. त्यांना सन्मानाची वागणूक होती. परंतु, हा सन्मान जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे टक्केवारी घेणार्‍या आमदारांना घरी बसवून उच्चशिक्षित व सर्व क्षेत्रात चांगली कामगिरी करणार्‍या चित्रलेखा पाटील यांना आमदार म्हणून पाठवा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

पुढे ते म्हणाले, राज्याच्या राजकारणात वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार म्हणून विधानसभेत गेले पाहिजेत. निवडणुकीच्या निमित्ताने चित्रलेखा पाटील यांच्या प्रचारासाठी तळागाळातील काँग्रेसचा कार्यकर्ता एकत्र आला आहे. चित्रलेखा पाटील यांना निवडून देण्यासाठी कार्यकर्ता बाहेर पडला आहे, त्यामुळे चित्रलेखा पाटील भाग्यवान आहेत. एक-एक मत मिळवण्याचे काम केल्यास आपला विजय हा नक्कीच होणार आहे. उमेदवार तुम्ही आहात या भावनेतून काम करून विरोधकांना घरी बसवा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले. यावेळी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे, काँग्रेसचे राज्य प्रदेश सचिव अ‍ॅड. प्रवीण ठाकूर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भास्कर चव्हाण, योगेश मगर आदी मान्यवरांनीदेखील मनोगत व्यक्त करीत उपस्थितांना संबोधित केले.

Exit mobile version