केंद्रातील अहंकारी व आडमुठ्या नरेंद्र मोदी सरकारला देशभरातील शेतकर्यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्यास भाग पाडून देशातील शेतकर्यांमध्ये राज्यकर्त्यांना नमविण्याची ताकद काय असते हे कृतीने दाखवून दिले आहे. या पाश्वर्र्भूमीवर देशातील विरोधी पक्ष एकत्र आल्यास या सरकारला नमविणे शक्य असल्याचा विरोधकांना आत्मविश्वास वाटत असून त्याचा प्रत्यय नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या संयुक्त शेतकरी तथा कामगार महापंचायतीमध्ये दिसून आला. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी या प्रसंगी केलेल्या भाषणातून तसेच शेतकरी नेते राकेश टिकैत यांनीही आपल्या विवेचनातून नेमक्या याच गोष्टीवर बोट ठेवले. केंद्राने आणलेले तीन कृषी कायदे हे शेतकर्यांवर अन्याय करणारे होते.त्यामुळे या कायद्याला संयुक्त मोर्चाच्यावतीने विरोध करण्यात आला होता. या आंदोलनाला राज्यातूनही शेकापसह डावे पक्ष तथा संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला होता. तो कायम आहे. सरकारने कायदे मागे घेतले असले तरी अजूनही आधारभूत किंमतीबाबतचा मुद्दा बाकी आहे. त्यामुळे जोपर्यंत हा कायदा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय संयुक्त मोर्चाने घेतला आहे. त्या निर्णयालाही राज्यातील शेकापसहित सर्वच डावे पक्ष व संघटनांचा पाठिंबा कायम राहिला आहे. कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी नवी दिल्लीत सुरु करण्यात आलेल्या शेतकरी आंदोलनाला या महिन्यात एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभराच्या कालखंडात आंदोलन करणारे सातशेहून अधिक शेतकरी शहीद झाले. त्या शहीद शेतकर्यांचे अस्थिकलश मुंबईत आणण्यात आले होते. या अस्थिकलश यात्रेत राज्यातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांसह कामगार, सामाजिक संघटना सहभागी झालेल्या दिसल्या. मुंबईतील अस्थिकलश यात्रेचे आयोजन संयुक्त किसान मोर्चा, जनआंदोलन संघर्ष समिती व कामगार संघटना संयुक्त कृती या संघटनांनी केले होते आणि त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, आप पक्ष, समाजवादी पक्ष आदी समविचारी पक्षांचे नेते, कामगार नेते तसेच जनआंदोलनाच्या संघर्ष समितीचे नेते सहभागी झाले होते. त्यातून विरोधी पक्ष एकवटल्याचे दिसले. ही एकी टिकविण्यासाठी संयुक्त रणनिती आवश्यक आहे. एकेकाळी स्वर्गीय इंदिरा गांधी या पंतप्रधानपदी असताना असाच विरोधी पक्ष कमकुवत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. तेव्हा इंदिराजींची ताकद ही विरोधकांचा कमकुवतपणा म्हटला जात असे. विरोधक एक झाले की पर्यायी सशक्त शक्ती उभी राहते, हे आता दिसू लागले आहे. त्याही पूर्वी म्हणजे सुमारे नऊ दशकांआधी रायगडमध्ये असेच आंदोलन घडले होते आणि त्यावेळच्या शेतकर्यांनी तेव्हाच्या इंग्रज सरकारलाही आपले आडमुठे धोरण बदलण्यास भाग पाडले होते, हे लक्षात ठेवायला हवे. यावेळी जयंत पाटील यांनी आठवण करून दिलेले 88 वर्षांपूर्वी अलिबाग तालुक्यातील चरी येथे स्व.नारायण नागू पाटील यांनी घडवून आणलेले ते संपाचे आंदोलन होते. त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीही या नेतृत्वाच्या सोबत उभे राहण्याची भूमिका निभावली होती. त्यावेळी शेतकर्यांनी प्रदीर्घ काळ शेतजमीन न कसण्याचे धोरण अवलंबल्याने सरकारला या विलक्षण स्वरूपाच्या ठाम आंदोलकांनी उभारलेल्या संपाची दखल घ्यावी लागली होती आणि इतिहास बदलला होता. कारण, त्यामुळेच पुढे कसेल त्याची जमीन आणि कुळ कायदा हे दोन महत्त्वाचे कायदे अस्तित्वात आले. त्याच धर्तीवर केंद्रातील कृषी कायदे मागे घेण्यास भाग पाडून देशातील शेतकर्यांनी आपली तीच ताकद आजच्या काळातील इंग्रज सरकारसारखा सापत्न व्यवहार करणार्या मोदी सरकारला दाखवून दिली आहे. चरीचा संप आणि सध्या सुरु असलेला शेतकर्यांचा संप हे एकाच स्वरुपाच आहेत, असे जयंत पाटील आपल्या भाषणात म्हणाले, ते खरे आहे. त्याचीच जाणीव विरोधकांनी ठेवायला हवी आणि एकीसाठी आता जसे एकत्र आले तसे व्यापक धोरणाच्या छत्राखालीही एकत्र राहिले पाहिजेत. त्यातूनच यापुढील लोकसभेसाठीच्या लढ्यासाठी ताकद उभी राहील. तसे नाही झाले तर मग तो या ताज्या आंदोलनात शहीद झालेल्या सुमारे सातशे हुतात्म्यांचे बलिदान वाया गेले असे होईल. मात्र तसे होणार नाही असा निर्धार या महापंचायतीच्या निमित्ताने या हुतात्म्यांच्या अस्थिकलशासमक्ष करण्यात आला आहे. त्याची जाण ठेवून हे एकीचे हत्यार या अन्यायकारक, शोषक सरकारच्या विरुद्ध वापरायलाच हवे.
एकी बळकट व्हावी
-
by Krushival

- Categories: sliderhome, संपादकीय
- Tags: Editorialmarathimarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsunity
Related Content
कोकणातले पर्यटक परतीच्या मार्गावर
by
Sanika Mhatre
January 1, 2026
भाजपा फुटीच्या उंबरठ्यावर: सुषमा अंधारे
by
Sanika Mhatre
January 1, 2026
एसटीचा रस्ता सुरक्षा अभियान दिखावा
by
Sanika Mhatre
January 1, 2026
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बरसला पाऊस
by
Sanika Mhatre
January 1, 2026
नववर्षात नौदलाचे सामर्थ्य वाढणार
by
Sanika Mhatre
January 1, 2026
शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या रील करणे पडणार महागात
by
Sanika Mhatre
January 1, 2026