पोलादपूरमध्ये विनापरवाना वीटभट्ट्या;तहसिल विभागाकडून कारवाई

। पोलादपूर । प्रतिनिधी ।
पोलादपूर तालुक्यात पूर्वापार अनेकांचा वीटभट्टीचा व्यवसाय अव्याहतपणे सुरू असताना गेल्या काही वर्षांपासून पोलादपूर तहसिल कार्यालयाकडून एकाही वीटभट्टीसाठी परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती काही आरटीआय कार्यकर्त्यांना मिळालेल्या लेखी उत्तरात देण्यात आली आहे. मात्र, पोलादपूर शहरासह तालुक्यात सुमारे 50 हून अधिक वीटभट्ट्या सुरू असून, या विनापरवाना वीटभट्ट्यांसाठी पोलादपूर तहसिल कार्यालयाची स्वतंत्र यंत्रणा नियंत्रण व दंडात्मक कारवाई करीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

पोलादपूर तालुक्यातील पोलादपूर, सवाद, माटवण, कालवली, दिवील, कापडे, पितळवाडी भागात मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या सुरू झाल्या आहेत. या सर्व वीटभट्ट्यांवर असंघटित कामगार क्षेत्रातील मोठी श्रमशक्ती म्हणून आदिवासी कुटुंबांचे स्थलांतर करून उपयोगात आणली जात आहे. या कुटुंबांमध्ये जोडपे आणि लहान मुलांचा समावेश असतो. पोलादपूर तालुक्यातील वीटभट्टीतील विटांना महाबळेश्‍वर, पाचगणी येथे मोठ्या प्रमाणात मागणी असून, नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत कच्च्या मातीच्या विटा पाडून भट्टी रचण्याचे काम सुरू होत असताना जानेवारी महिन्याच्या प्रारंभीच भट्ट्या पेटविण्याचे काम सुरू होते. यामुळे जानेवारी महिन्यामध्ये नवीन विटा बांधकाम क्षेत्रामध्ये बिल्डींग मटेरियल सप्लायर्सकडून उपलब्ध होऊ लागतात. यासाठी एक हजार विटांसाठी 10 ते 14 हजार रूपयांपर्यंत दर आकारले जात असतात.

पोलादपूर तालुक्यातील भोराव ते कालवली रस्त्यालगतच्या अनधिकृत वीटभट्ट्यांतून विटा वाहून नेणार्‍या ट्रक व अन्य वाहनांमुळे शेतातील चिखल रस्त्यावर येत असून, वीटभट्ट्यांकडे स्थानिक तलाठी व मंडल यांचे तर रस्त्याकडे पोलादपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, या रस्त्यावरून जाणार्‍या मिनीडोअर, रिक्षा, कार, एसटी बसेस, मोटारसायकली यांना या चिखलाच्या ठिकाणी वाहन चालविणे जिकिरीचे होत असते. सप्तक्रोशीतील ग्रामस्थांनी या रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यावेळी ही मोठी वीटभट्टी महत्त्वाचा मुद्दा ठरली होती.

पोलादपूर शहरासह तालुक्यात सुमारे 50 हून अधिक ठिकाणी वीटभट्ट्या रचल्या जाऊन त्या पेटविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोडही केली जात असल्याचे दिसून येत आहे. पोलादपूर तालुक्यातील शून्य वीटभट्टी अहवालामागे कारणीभूत असलेल्या मंडल आणि अव्वल कारकून यांच्या संयुक्त विद्यमाने अनेकांना आक्षेप अथवा कागदोपत्री तक्रार केल्यास दिलासा देण्याचे काम होत असून, पर्यावरणाचे संतुलन बिघडविण्यास कारणीभूत ठरणार्‍या या वीटभट्ट्या राजरोसपणे जाळून प्रदूषणात भर करीत आहेत. पोलादपूर तहसिल कार्यालयामधील एक अव्वल कारकून यासंदर्भात अनेक माहिती अधिकारांच्या कार्यकर्त्यांना वीटभट्ट्यांबाबत दिलासा देण्यासाठी तत्पर असल्याचे समजून येत आहे.

पोलादपूर तालुक्यातील राजरोसपणे सुरू असलेल्या वीटभट्ट्यांसाठी रॉकेल व किटा जळाऊ लाकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे तालुक्यात जंगलतोडही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे वीटभट्ट्या ताडपत्रीने झाकून ठेवण्याची नौबतही शेतकर्‍यांवर आली आहे.

Exit mobile version