माथेरान पॉईंट परिसरात अस्वच्छता

| माथेरान | वार्ताहर |

माथेरानमधील अनेक भागतील पॉईंट परिसरात कचरा, रिकामी पाण्याच्या बाटल्या तसेच येथील शौचालयात खूप घाण, दुर्गंधी, अस्वच्छता पसरली असल्याची तक्रार येथील दुकानदार समाजमाध्यमांवर करीत असून नगरपालिकेने त्वरित याकडे लक्ष देऊन हा पॉईंट, परिसर स्वच्छ करावा अशी मागणी या पॉईंट परिसरातील हे छोटेमोठे दुकानदार करीत आहेत.

जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या माथेरान मध्ये मे महिन्याच्या सुट्टीत दिवसेंदिवस पर्यटकांचा ओघ वाढताना दिसत आहे. येणार्‍या पर्यटकांकडून प्रत्येकी पन्नास रुपये प्रवासी कर वसूल करण्यात येतो. त्या बदल्यात पर्यटकांना माथेरान मध्ये योग्य सोयी सुविधा पुरविल्या जातात. परंतु येथील शारलोट तलाव परिसरात कचरा कुंड्या बसविल्या असल्यातरी त्या नियमितपणे स्वच्छ केल्या जात नाहीत अशी तक्रार येथील दुकानदार करीत आहेत. त्याच बरोबर इको पॉईंट परिसरात देखील पर्यटकांसाठी उभारण्यात आलेली शौचालये देखील नियमित स्वच्छ केली जात नसून मोठ्या प्रमाणावर घाण आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे पर्यटकांना याचा वापर करताना कुचंबना होते. त्यामुळे संबंधीत खात्याने याकडे दुर्लक्ष न करता पर्यटकांच्या सोयी सुविधेसाठी या शौचालयाची नियमित स्वच्छता करावी अशी मागणी येथील दुकानदार व्यावसायिक करीत आहेत. त्यामुळे दुकानदारांच्या रास्त मागणीकडे संबंधित अधिकारी वर्गाने वेळीच लक्ष देणे आवश्यक असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.

शारलोट तलाव परिसरात कचरा कुंड्या आहेत परंतु पालिका कर्मचारी दररोज कचरा संकलनासाठी येत नाहीत. आम्ही आमची दुकाने बंद करून गेल्यावर येथील माकडे खाण्याच्या शोधात हा कचरा इतरत्र पसरवतात त्यामुळे परिसर अस्वच्छ दिसतो आहे.

संतोष कदम दुकानदार
शारलोट तलाव परिसर

Exit mobile version