जीर्ण खांब, झाडाच्या फांद्या महावितरणाची बनली डोकेदुखी
| माणगाव | वार्ताहर |
पावसाळा अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला असतानाच अवकाळी वादळी पावसाने आपले उग्र रूप धारण केले आहे. या काळात माणगाव तालुक्यातील विविध गावात वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. उष्णतेने अधिक व्याकुळ झालेल्या नागरिकांना विजेच्या या लपंडावाचा मोठा फटका बसत आहे. अवकाळी वादळी पावसाने अचानकच थैमान घातल्यामुळे सुस्तावलेल्या विज महावितरण कंपनी अधिकारी व कर्मचार्यांची चांगलीच झोप उडाली आहे. अनेक ठिकाणी वीज वितरण कंपनीचे जीर्ण झालेले खांब तसेच विद्युत वाहिनीवर येणार्या झाडांच्या फांद्या ही सर्वांची डोकेदुखी बनली आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून माणगाव तालुक्यात अवकाळी वादळी पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जीर्ण झालेले विद्युत खांब कोसळले आहेत. तर ठीक ठिकाणी विद्युत वाहिनीवर येणार्या झाडांच्या फांद्या पडतात. त्यामुळे वीज वाहिनी तुटते. त्याचबरोबर अनेक वीज समस्यांना वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्यांना तोंड द्यावे लागत आहे. या वीज वाहिनीवर असणारी झाडे तोडण्यास परवानगी नसल्यामुळे वीज वाहिणीवर येणार्या झाडांच्या फांद्या तोडून वीज पुरवठा चालू करण्यासाठी कर्मचार्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
माणगाव तालुका हा तीन विभागात विखुरला गेला आहे. गोरेगाव उपविभाग, माणगाव उपविभाग आणि रोहा उपविभाग या तीन उपविभागापैकी बहुतांश उपविभागाचे काम 60 ते 70 टक्के माणगाव उपविभाग सहाय्यक अभियंता यांच्याकडे येते. या तालुक्यात वेगवेगळे फिडर बसविण्यात आले असून या फिडरमार्फत वीज पुरवठा केला जातो.
पावसाळ्यापूर्वी वीज महावितरण कंपनी झाडांच्या फांद्या तोडून वीज पुरवठा सुरळीत कसा करता येईल यासाठी प्रयत्न करते. वीज वितरण कंपनीचे 50 टक्के कर्मचारी कायमस्वरूपी काम करीत आहेत. उर्वरित 50 टक्के कर्मचारी ठेकेदरी पद्धतीवर काम करीत आहेत. एका बाजूला विजेचे वाजवी दर लावले आहेत. वीज वापर, वीज कर, वीज भाडे, मीटर भाडे असे विविध कर लावून ग्राहकावर लाईट बिल आकारण्यात येते. ग्राहक ते वेळोवेळी भरतात मात्र ग्राहकांना चांगली सेवा देणे हे शासनाचेही कर्तव्य आहे. वीज वितरण कंपनीत अनेक कर्मचार्यांची रिक्त पदे आहेत. ही रिक्त पदे शासन कधी भरणार हा प्रश्नच आहे. सध्या माणगाव शहरात तसेच तालुक्यातील विविध गावात विज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याच्या घटना घडत असल्याने नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठा योजना तसेच विजेवर चालणारे झेरॉक्स, पिठ चिक्की, हॉटेल व्यवसायिक, दूध संकलन केंद्र, मच्छी व्यवसायिक तसेच विजेवर चालणारी सर्व उपकरणे यांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
मंगळवारी आम्ही या फिडरवर विजेचे मेंटेनन्सचे काम करतो. त्यामुळे वीज पुरवठा बंद करावा लागतो. तसेच माणगाव उपविभागातील काही गावात असणारे विजेचे खांब नुकत्याच झालेल्या अवकाळी वादळी पावसाने कोसळले आहेत. ते बसवण्याचे काम युद्ध पातळीवर केले. तसेच काही जीर्ण झालेले विजेचे खांब बदलण्याचे काम वितरण कंपनीने हाती घेतले आहे. विद्युत वाहिनी खाली असणारी झाडे तोडण्याची परवानगी आम्हाला नसल्यामुळे या वाहिनीवर येणारी झाडाच्या फांद्या तोडण्याचे काम आम्ही करत आहोत. वादळामुळे वीज कंपनीचे प्रचंड नुकसान होते. अशावेळी नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक अभियंता बामणकर यांनी केले आहे.