वीटभट्ट्यांसह शेतकर्यांचे नुकसान
| नागोठणे | वार्ताहर |
नागोठणे परिसरात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. त्याचे रुपांतर रविवारी (दि.12) रात्री पावसाच्या शिडकाव्यात झाले. रविवारी रात्री पडलेला पाऊस हा तुरळक होता. मात्र, सोमवारी (दि.13) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाच्या सरी आल्यामुळे सर्वसामान्य लोकांबरोबरच शेतकर्यांची व वीटभट्टी व्यावसायिकांचीदेखील तारांबळ उडाली. या पावसामुळे वीटभट्टीचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसाने विटा बनवण्यासाठी लागणारी माती वाहून गेली. त्याचप्रमाणे भट्टीत टाकलेल्या विटांचेदेखील नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे नागोठणे विभागातील वीटभट्ट्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने नुकसानग्रस्त वीटभट्ट्यांचे पंचनामे करून शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी वीट व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत काही दिवसांपासून अचानक वार्यांसह मुसळधार अवकाळी पाऊस कोसळत आहे. यामध्ये नागोठणे परिसराचाही आता समावेश झाला आहे. या पावसामुळे शेतकर्यांसह वीट व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी व वीटभट्टी व्यवसायिक मेटाकुटीला आले आहेत. वीटभट्टी व्यावसायिकांनी तयार करुन ठेवलेल्या कच्च्या विटांवर पडलेल्या पावसाने विटांची पूर्णतः माती झाली असल्याचे काही वीटभट्टी व्यावसायिकांनी सांगितले. काहींनी पाऊस पडायला सुरुवात होताच कच्च्या विटांवर तात्काळ ताडपत्री टाकण्यासाठी धडपड केली, मात्र ताडपत्री घेऊन वीटभट्टीवर पोहोचेपर्यंत उशीर झाल्याने कच्च्या विटांचे पावसामुळे नुकसान झाले. आधीच कोरोनोचे संकट, नंतर चक्रीवादळ, त्यात हा पडणारा अवकाळी पाऊस त्यामुळे रॉयलटीच्या रूपाने शासनाची तिजोरी भरणारे वीट व्यावसायिक आज आर्थिक संकटात सापडले असून, डोक्यावर कर्ज घेऊन उभारलेला वीट व्यवसाय आज धोक्यात आला आहे. तरी शासनाने याची वेळीच दखल घेऊन या नुकसानग्रस्त वीट व्यावसायिकांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
अवकाळी पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांना नुकसानीला सामोरे जावे लागते; परंतु शासनाकडून कोणतीही मदत होत नाही. अवकाळीमुळे नुकसान झालेल्या वीटभट्टीचे पंचनामे करून नुकसानभरपाई दिली जाते. त्याचप्रमाणे आमच्या वीटभट्टीचे पंचनामे करून सरकारने आम्हाला देखील नुकसानभरपाई द्यावी.
निखील मढवी,
अध्यक्ष,
नागोठणे विभाग वीटभट्टी संघटना