| पोलादपूर | प्रतिनिधी |
गेल्या काही दिवसांपासून 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद मोबाईल वरील ॲप दिसत असताना घामाघुम होणाऱ्या पोलादपूरकरांना गुरुवारी सहा वाजण्याच्या सुमारास अवकाळी पाऊस, वादळ आणि विजांचा कडकडाट झाल्याने उष्णतेपासून दिलासा मिळाला. मात्र, वादळी पावसामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले आणि काही ठिकाणी झाड कोसळल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
पोलादपूर तालुक्यात यापूर्वी लहुळसे येथे अवकाळी पावसाने 20 मार्च रोजी हजेरी लावली होती. त्यानंतर दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागली आणि 23 एप्रिल रोजी तब्बल 43 अंश सेल्सियस तापमानाची मोबाईलवरील ॲपमध्ये नोंद दिसून आली. सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास अचानक आकाशात ढग दाटून आले आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. वादळी वारे वाहू लागले आणि अवकाळी पावसाला सुरुवात झाली. तब्बल पाऊण तास विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या या अवकाळी पावसाने सैनिक नगर, आनंदनगर, गोकुळ नगर, जाखमाता नगर, बाजारपेठ तसेच पोलादपूर ते महाबळेश्वर रस्त्यावरील बाजारपेठ या भागांमध्ये झाडाच्या फांद्या पडणे, झाड कोसळणे, घराच्या छपराचे पत्रे उडून जाणे असे अनेकांचे नुकसान घडवून काळोखात विश्रांती घेतली. यावेळी आनंदनगरमध्ये एक झाड कोसळले असून सैनिकनगरमधील गणेश उतेकर यांच्या घराच्या छपराचे काँक्रीटचे पत्रे उडून फुटल्याचे दिसून आले.अवकाळी पावसाच्या निमित्ताने महावितरणकडून विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. गेल्या काही दिवसापासून महावितरणकडून पूर्व सूचना न देता विजेचा लपंडाव सुरू असताना अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर हवेत काहीचा गारवा निर्माण झाला.
पोलादपूरमध्ये अवकाळी पाऊस
