| कर्जत | वार्ताहर |
अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आज सायंकाळी नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. गेली आठवडाभर उन्हामुळे वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढले होते. अंगाची लाही लाही होत असताना आज अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे काही प्रमाणात गारवा निर्माण झाला असला तरी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ होताना दिसली.
कालपासूनच ढगाळ वातावरण दिसत असल्याने अखेर आज या अवकाळी पावसाने हजेरी लावली. सुरुवातीला जोरदार वारा सुटल्याने सर्वत्र धूळ पसरताना दिसत होती. त्यानंतर पावसानी जोरदार हजेरी लावली.परंतु, या अवकाळी पावसामुळे चाकरमान्यांची चांगलीच धावपळ झाली. सायंकाळी शाळा, कॉलेज, कामगारवर्ग सुट्टी होऊन घरी परतत असताना आवकाळी पावसामुळे रिक्षा, बस पकडण्यासाठी आणि रेल्वेस्टेशनवर नागरिकांची गर्दी पहायला मिळाली. तर दुसरीकडे या आवकाळी पावसामुळे कर्जत तालुक्यातील वीटभट्टी व्यवसायिक आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात वीट व्यवसायिक असल्याने या उन्हाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात वीट पडण्याचे काम सुरू असते. तर दुसरीकडे तयार झालेल्या विटांची भट्टी लावण्याचे काम देखील जोरदार सुरू असते. परंतु, अशा अवकाळी पावसामुळे लावलेली भट्टी विजल्याने अर्धवट अवस्थेत भाजलेल्या विटांमुळे वीट व्यवसाय करणाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कच्चा थापलेल्या विटा भिजल्यामुळे त्याचे देखील नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाचा फटका येतील शेतकऱ्यांना देखील होताना दिसत आहे. आंब्याची शेती करणाऱ्या शेतकरी देखील ह्या अवकाळी पावसामुळे अडचणीत आला आहे. आंब्याच्या झाडाला आलेला मोहर तसेच तयार झालेल्या आंब्यांना पाणी लागल्याने आंबा बागायतदारांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. एकंदरीत काय तर अर्धा तास पडलेल्या या अवकाळी पावसामुळे वातावरणात काही काळ गारवा निर्माण झाला, असला तरी येथील वीट भट्टी व्यावसायिक आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.