माणगावात अवकाळी पावसामुळे पेरलेल्या कडधान्यांचे मोठे नुकसान

गरीब शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळावी : विजयशेठ मेथा


| माणगाव | प्रतिनिधी |

तालुक्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मधल्या काही दिवसांत नुकसान झाले असून, भातकापणीचा हंगाम संपल्यानंतर आता शेतकऱ्यांनी पेरलेल्या कडधान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या गरीब शेतकऱ्यांना लवकरात लवकर शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी धनंजय राईस मिलचे मालक तथा उद्योजक खेमचंद उर्फ विजयशेठ मेथा यांनी केली आहे.

माणगाव तालुक्यात सोमवार, दि. 27 व मंगळवार, दि. 28 नोव्हेंबर रोजी सलग दोन दिवस अवकाळी पाऊस पडल्याने तालुक्यातील शेतकरी राजा चिंतातुर झाला आहे. या शेतकऱ्यांनी भातकापणीचा हंगाम संपल्यानंतर पेरलेल्या कडधान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बहुतांशी शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हा त्यांच्या शेती व्यवसायावर चालत असतो. काही शेतकरी आपल्या मालकी हक्काच्या शेतातून तसेच भाड्याने घेतलेल्या शेतातून दुबार भातशेती करीत असतो. तर काही शेतकरी पावसाळी भात शेतीची कापणी झाल्यावर आपल्या शेतातून कडधान्यांची पेरणी करीत असतात. माणगाव तालुक्यातील विविध गावांतील शेतकऱ्यांनी यावर्षी भातकापणीचा हंगाम संपल्यानंतर आवरा, पावटा, मूग, हरभरा, मटकी यांसारख्या कडधान्यांची पेरणी केली असून या कडधान्यांची रोपे हाताच्या पंजाएवढी मोठी झालेली असताना अवकाळी पडलेल्या पावसामुळे हि रोपटे शेतात आडवी झाल्याने शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अवकाळी पाऊस झाल्याने आम्ही 8 ते 10 एकरांमध्ये पेरलेली आवरा, मूग, हरभरा, मटकी यांसारख्या कडधान्यांचे नुकसान झाले असून, माय-बाप सरकारने आम्हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकर भरपाई देऊन आमचे आश्रू पुसावेत.

दत्ताराम रामा तेटगुरे, शेतकरी, साळवे, ता. माणगाव
Exit mobile version