अवकाळी आता नैसर्गिक आपत्तीच: राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

| मुंबई | प्रतिनिधी |
शिंदे सरकारने शेतकर्‍यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान हे आता नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्‍चित केले जाणार आहे. बुधवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांची चिंता दूर झाली आहे. शेतक-यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करताना अडचण निर्माण होत होती. त्यामुळे अवकाळी पाऊस हा आता नैसर्गिक आपत्ती म्हणून गृहीत धरला जाणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला आहे. या निर्णयामुळे शेतकर्‍यांना थेट आर्थिक मदत करणे आता शक्य होणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत अचूक पंचनामे केले जावेत अशा पार्श्‍वभूमीवर चर्चा झाली. 31 कोटींच्या नुकसानीचे पंचनामे होऊन सरकारकडे आले असून त्याचाही सहानुभूतीने विचार करण्याचा आदेश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे. जेव्हा कधी शेतकर्‍यांचं नुकसान होतं तेव्हा काहीतरी नियमावली असली पाहिजे. त्याचं काम सध्या अंतिम टप्प्यात आली आहे, अशी माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

यापुढे सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजली जाईल. 10 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस सलग पाच दिवस पडल्यास नैसर्गिक आपत्ती समजली जाईल. हा राज्य सरकारचा शेतकर्‍यांच्या हिताचा सर्वात मोठा निर्णय आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकर्‍यांना तातडीची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. – अब्दुल सत्तार,कृषीमंत्री

Exit mobile version