अलिबाग चॅम्पियन्स चषकाचे अनावरण

आयपीएलच्या धर्तीवर 224 खेळाडूंचा लिलाव ; 16 संघांचा असणार सहभाग

| अलिबाग | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना अलिबाग शहर पुरस्कृत व प्रशांत नाईक मित्रमंडळ अलिबाग आयोजित नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 11 ते 13 जानेवारीला या स्पर्धा क्रीडा भुवन येथे होणार आहेत. माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या स्पर्धेतील चषकाचे अनावरण आणि आयपीएल धर्तीवर खेळाडूंचा लिलाव नुकताच झाला.

यावेळी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रदीप नाईक, माजी नगरसेवक सतीश प्रधान, शेकाप शहर अध्यक्ष अशोक प्रधान, माजी नगरसेवक अनिल चोपडा, प्रशांत नाईक मित्र मंडळाचे सदस्य महेश पाटील, प्रकाश राठोड, कपिल अनुभवणे, शेखर, काशिकर आदींसह असंख्य खेळाडू उपस्थित होते.

कुरुळ येथील क्षात्रैक्य समाज हॉलमध्ये शुक्रवारी (दि. 5 जानेवारी) लिलाव प्रक्रिया पार पडली. यावेळी 318 खेळाडू सहभागी झाले होते. त्यात 224 खेळाडूंची निवड करण्यात आली. यामध्ये मल्हार वॉरिअर्स अलिबाग, त्रिश्राव्या 11 वरसोली, धर्मवीर ग्रुप दिघोडी, आझाद 11 कुरुळ, एसपी सुपर प्लेअर्स आंबेपूर, आद्य सप्लायर्स म्हात्रोळी, हार्दिक वॉरिअर्स भोनंग, एम.डी. वॉरिअर्स थळ, सिया वॉरिअर्स नागाव, सरपंच पिंट्या गायकवाड मित्रमंडळ चोंढी, कुबेर 11 अलिबाग, अक्षया हॉटेल 11 अलिबाग, एस.पी. भार्गवी 11 अलिबाग, सिद्धी कन्स्ट्रक्शन कुरुळ, मी हाय कोळी रिसॉर्ट नागाव, आर.सी. ग्रुप अलिबाग या 16 संघांचा सहभाग असणार आहे. या सर्व संघांचे कर्णधार रोहित पाटील, सुमेध पत्रे, सागर पाटील, प्रसाद म्हात्रे, कैवल्य पाटील, सुमित भगत, निखील पाटील, पंकज जाधव, प्रफुल्ल पाटील, ऋषीकेश राऊत, सूरज पाटील, अक्षय म्हात्रे, प्रसाद पाटील, प्रशांत मोहोरे, अक्षय पाटील, विनोद वाटकरे आहेत.

बक्षिसांची बरसात
स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणारा संघ अलिबाग चॅम्पियन चषकाचा मानकरी ठरणार आहे. त्या संघाला दोन लाख रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाला एक लाख रुपये व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकाला प्रत्येकी 50 हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट फलंदाज व गोलंदाजाला एलईडी टीव्ही, मालिकावीराला दुचाकी देऊन सन्मानित केले जाणार आहे. तसेच विजेता संघ मालक, उपविजेता संघ मालकाला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. ही स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघे पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. स्पर्धा पाहण्याबरोबरच खेळण्यासाठी खेळाडूंसह क्रीडाप्रेमींची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
Exit mobile version