| रायगड | प्रतिनिधी |
मतदार नोंदणी आणि मतदारयाद्यांचे अद्ययावत करण्याचे काम निवडणूक विभागाकडे असते. यापैकी नोंदणी कार्यक्रम पारदर्शक राबविला जातो; परंतु मतदारयाद्यांचे अद्ययावतीकरण कार्यक्रमाचे नियोजन ढिसाळ आहे, असा आरोप शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार पंडित पाटील यांनी केला. राजकीय दबावाखाली येऊन बोगस मतदानाला खतपाणी घातले जात असल्याचेही ते म्हणाले.
माजी आमदार पंडित पाटील यांनी मतदारयाद्यांच्या अद्ययावतीकरण करण्याबाबत रायगड जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के आणि निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे यांची भेट घेऊन मतदार याद्यांमध्ये असणारा घोळ निदर्शनात आणून दिला. यावेळी त्यांच्यासमवेत आंबेपूर ग्रामपंचायत सरपंच सुमना पाटील, रेवस ग्रामपंचायत उपसरपंच दीपक पाटील आदी उपस्थित होते.
रायगड जिल्हा औद्योगिक जिल्हा आहे. परराज्यातील हजारो नागरिक रोजगारासाठी रायगड जिल्ह्यात स्थलांतरित झाले आहेत. अशा स्थलांतरित कामगारांच्या मतदार यादीतील नावावर पंडित पाटील यांनी आक्षेप घेतला. आधारकार्ड परजिल्ह्यातील असताना रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये असणाऱ्या गावांमध्ये या कामगारांची नावे आहेत. ही नावे स्थानिक लोकप्रतिनिधींनी नोंदणी केल्याने नोंद झालेली आहेत. अशी परजिल्ह्यातील नावे रद्द करण्याची गरज आहे. काही ठिकाणी मतदारयादीमध्ये असणाऱ्या मतदारांचे केवळ नाव असते परंतु तो मतदार प्रत्यक्ष नसतो. यामुळे प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत काळाबाजार होत असल्याचा आरोपही पंडित पाटील यांनी केला.
रायगड जिल्हा प्रशासनाकडे असणाऱ्या याद्या अद्ययावत नसल्याने याद्यांमध्ये मृत्यू झालेल्या मतदारांची नावे अद्यापही दिसून येत आहेत. ही नावे तातडीने वगळली नाही तर प्रभाग रचनेवर त्याचा परिणाम जाणवतो. यासाठी लोकप्रतिनिधींनी नावे वगळण्याबाबत प्रशासन दरबारी पत्रव्यवहार केला आहे. परंतु अद्याप ही नावे वगळण्यात आली नाहीत हे निदर्शनात आणून देत मतदानकेंद्र अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर पंडित पाटील यांनी आक्षेप घेतला. निवडणूक विभागाने संपूर्ण जिल्ह्यात मतदारयाद्यांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी सर्वेक्षण करावे आणि त्याबाबतच्या सुनावणी घेऊन याद्या अद्ययावत कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. बोगस मतदार नोंदणी करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप पाटील यांनी केला.
माजी आमदार पंडित पाटील यांनी केलेल्या मागणीला अनुसरून निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकाऱ्यांना मतदारयाद्या अद्ययावत करण्यासाठीच्या सूचना दिल्या असून सर्वेक्षण करण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर मृत्यू झालेले मतदार, स्थलांतरित मतदार, दुबार मतदार यांची नावे मतदारयाद्यांमधून वगळण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. तर मतदान केंद्र अधिकारी म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना याबाबतच्या तातडीने सूचना देण्यात याव्यात, असे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी सांगितले.