उरण-बेलापूर रेल्वेच्या फेऱ्या वाढवणार

नवी स्थानके सुरू करण्याच्या हालचाली

| उरण | प्रतिनिधी |

मध्य रेल्वेच्या बेलापूर-उरण रेल्वेमार्गावरील प्रवाशांना आता दुहेरी भेट मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाने या मार्गावर 10 फेऱ्या वाढवण्याचे नियोजन पूर्ण केले आहे. त्याच बरोबर तरघर आणि गव्हाण या दोन रेल्वे स्थानकांची कामेदेखील पूर्ण झाली आहेत. फेऱ्या वाढीसह नवी स्थानके याच महिन्यात सुरू करण्याच्या हालचाली मध्य रेल्वेकडून सुरू झाल्या आहेत. नवी मुंबई विमानतळाच्या जवळ तरघर रेल्वे स्थानक असल्याने त्याचा फायदा प्रवासी आणि विमानतळ कर्मचाऱ्यांना होणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर, ट्रान्स हार्बरच्या तुलनेत सीवूड बेलापूर-उरण मार्गावर लोकल फेऱ्या अत्यंत कमी आहेत. उरण मार्गावर प्रवासी संख्या वाढत असतानाही, लोकल फेऱ्या वाढवण्यात आलेल्या नाहीत. उरण मार्गावर दीड तासाच्या अंतराने लोकल उपलब्ध आहे. यामुळे लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली होती. सीवूड-बेलापूर-उरण मार्गावर पाच अप आणि पाच डाउन लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. त्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. यासह तरघर आणि गव्हाण ही दोन स्थानकेदेखील सुरू करण्यात येणार आहेत. दोन्ही रेल्वे स्थानकांतील कामे पूर्ण झाली आहेत. याच महिन्यात लोकल फेऱ्या आणि स्थानके एकाचवेळी खुली करण्यात येणार आहेत, असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. उरण- सीवूड -बेलापूर मार्गावर सुरुवातीला 10 अप आणि 10 डाउन लोकल फेऱ्या वाढवण्याचे नियोजन होते. मात्र, प्रवासी तिकीट विक्री आणि प्रवासी संख्या लक्षात घेता एकूण 10 लोकल फेऱ्या वाढवण्यावर एकमत झाले आहे. यामुळे उरण मार्गावरील एकूण फेऱ्यांची संख्या 40 वरून 50 वर पोहोचेल. वाढीव फेऱ्यांमुळे दोन फेऱ्यांमधील अंतर कमी होण्यास मदत होणार आहे, असे ही रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

उरण तालुक्यातील प्रवाशी नागरीकांच्या हितार्थ रेल्वे प्रशासनाने रेल्वे फेऱ्या मध्ये वाढ करण्यासाठी निर्णय योग्य घेतला असला तरी जासई गावाजवळील गव्हाण रेल्वे स्टेशनचे नामकरण हे रेल्वे प्रशासनाने बदलून गव्हाण – जासई रेल्वे स्टेशन असे करावे अशी जासई ग्रामस्थांची मागणी आहे.

संतोष घरत
सरपंच जासई ग्रामपंचायत

Exit mobile version