निधीअभावी उरण बायपास रखडला

वाहतूककोंडीतून उरणकरांची सुटका कधी?

| उरण | घन:श्याम कडू |

उरण शहरातील दिवसेंदिवस तीव्र होत चाललेली वाहतूककोंडी फोडण्यासाठी आठ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेला उरण बायपास प्रकल्प आजही अपूर्ण अवस्थेत अडकलेला आहे. तब्बल 62 कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील केवळ 12 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध नसल्याने उरण नगरपरिषदेच्या अखत्यारितील सुमारे 400 मीटर लांबीचा रस्ता रखडला असून, त्यामुळे संपूर्ण बायपासचे भवितव्यच अनिश्चित बनले आहे. परिणामी शहरवासीयांना अद्यापही वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.

उरण शहरातील वाहतूक ताण हलका करण्यासाठी उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर सिडकोने द्रोणागिरी नोडमधील आनंदी हॉटेल ते उरण शहरातील न्यायालयापर्यंत बायपास रस्ता विकसित करण्याची योजना आखली. या बायपास रस्त्याची एकूण लांबी 1 हजार 341 मीटर असून, यातील 400 मीटर लांबीचा भाग उरण नगरपरिषदेच्या अखत्यारित येतो, तर उर्वरित 941 मीटर लांबीचा रस्ता सिडकोमार्फत बांधण्यात येत आहे.
सिडकोच्या अखत्यारित सुरू असलेल्या या प्रकल्पामध्ये 640.425 मीटर लांबीचा पूल, 153.004 मीटर लांबीचा सिमेंट काँक्रीट रस्ता तसेच 148.071 मीटर लांबीची रिटेनिंग वॉल यांचा समावेश आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपासून सुरू असलेले पूल व रस्त्याचे काम सध्या सुमारे 85 टक्के पूर्ण झाले असून, सिडकोच्या अखत्यारितील उर्वरित काम 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रियांका रातांबे यांनी दिली आहे. बायपास व पूल कार्यान्वित झाल्यानंतर उरण शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न सुटेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

मात्र प्रत्यक्षात सिडकोचे काम पूर्ण झाले तरी उरण नगरपरिषदेच्या अखत्यारित येणारा 400 मीटर लांबीचा रस्ता तयार होईपर्यंत बायपासवरून वाहतूक सुरू होणे शक्य नाही. या रस्त्यासाठी आवश्यक असलेला सुमारे 12 कोटी रुपयांचा निधी पालिकेकडे उपलब्ध नसल्याने काम पुढे सरकत नाही. त्यामुळे एकीकडे कोट्यवधी रुपयांचे काम पूर्णत्वाकडे जात असताना, दुसरीकडे निधीअभावी संपूर्ण प्रकल्प ठप्प पडण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे.
दररोज शहरातील मुख्य रस्त्यांवर होणाऱ्या प्रचंड वाहतूककोंडीमुळे नागरिकांचे तासन्‌‍‍तास हाल होत असून, शाळकरी विद्यार्थी, रुग्णवाहिका, नोकरदार व व्यापारी वर्ग यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. केवळ 400 मीटर रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध न झाल्याने उरणकरांनी आणखी किती वर्षे या कोंडीत अडकून राहायचे, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे आणि परस्पर समन्वयाच्या अभावामुळे उरण बायपास प्रकल्प रखडल्याचा आरोप होत असून, तातडीने निधी उपलब्ध करून काम पूर्ण करण्याची जोरदार मागणी होत आहे.

Exit mobile version