बेकायदा बाजारासह पार्किंगचा धुमाकुळ; अधिकारी-कर्मचाऱ्यांचा अशिर्वाद असल्याचा आरोप
| उरण | प्रतिनिधी |
उरण चारफाटा येथे वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सिग्नलची व्यवस्था करण्यात आली असून, त्याची चाचपणी सुरू आहे. वाहनचालकही सिग्नलचे पालन करताना दिसत आहेत. मात्र, एका बाजूला वाहतूक शिस्तीचा गाजावाजा आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यावर बेकायदा बाजार, टपऱ्या, हातगाड्या आणि बेशिस्त पार्किंगचा धुमाकूळ सुरू असेल, तर सिग्नलचा हिरवा दिवा नेमका कशासाठी? असा संतप्त सवाल उरणच्या जनतेतून उपस्थित केला जात आहे.
उरण येथील चारफाटा परिसरात विशेषतः दर रविवारी भरणाऱ्या आठवडा बाजारामुळे मोठी गर्दी होते. त्यातच बेकायदा टपऱ्या आणि हातगाड्यांचा सुळसुळाट सुरू असल्याने रस्त्याच्या कडेला अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. इको, रिक्षा, टेम्पो तसेच खासगी वाहने भर रस्त्यात उभी केली जात असल्याने वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडत आहे. त्यामुळे रस्ता जनतेच्या वापरासाठी की अतिक्रमण करणाऱ्यांच्या सोयीसाठी? असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. तसेच, बेकायदा बाजार, टपऱ्या आणि हातगाड्यांकडून नियमितपणे वसुली केली जाते. या कथित वसुलीमध्ये शासकीय यंत्रणेतील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांचा वाटा असल्यामुळेच या बेकायदा धंद्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप जनतेतून होत आहे. त्यामळे चारफाट्यावरील बेकायदा धंदे आणि कथित वसुलीची वरिष्ठ पातळीवर निष्पक्ष चौकशी करून वसुलीमागचे हात कोणाचे आहेत, याचा पर्दाफाश करावा, अशी मागणी होत आहे.
तसेच, चारफाट्यावर उभारण्यात आलेल्या सर्कलमुळे मोठ्या वाहनांच्या वळणाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. एका बाजूचा रस्ता अरुंद असल्याने मोठ्या बसेसला वळण घेताना अडचणी येतात. त्यातच एसटी आणि एनएमएमटी बसस्थानकाची व्यवस्था योग्य नियोजनाशिवाय राबवली गेली, तर चारफाटा वाहतूक सुरळीत होण्याऐवजी आणखी कोंडीत जाण्याची शक्यता आहे. एसटी बसेससाठी इनगेटची व्यवस्था करण्यात आली असली तरी तो अद्याप सुरू करण्यात आलेला नाही. त्याचबरोबर रस्त्यावर वाहने कुठे उभी करावीत आणि कुठे उभी करू नयेत, हे स्पष्ट करणारे पांढरे पट्टेही अद्याप मारण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वाहनचालक मिळेल तिथे वाहने उभी करतात आणि वाहतूक कोंडीला निमंत्रण मिळते. याठिकाणी सिग्नलचा हिरवा दिवा लागला म्हणून चारफाट्याची वाहतूक हिरवीगार होणार नाही; आधी अतिक्रमणांचा काटा काढावा लागेल! बेकायदा बाजार, टपऱ्या, हातगाड्या आणि रस्त्यावरचे अनधिकृत पार्किंग हटविल्याशिवाय वाहतूक व्यवस्थेची सुधारणा केवळ कागदावरच राहील, असे उरणच्या जनतेतून बोलले जात आहे.
त्यामुळे संबंधित प्रशासनाने आता बघ्याची भूमिका सोडून मैदानात उतरावे. चारफाट्याची प्रत्यक्ष पाहणी करून बेकायदा अतिक्रमणे तातडीने हटवावीत, रस्त्यावरील अनधिकृत पार्किंगवर कठोर कारवाई करावी, एसटी इनगेट सुरू करावा, पांढरे पट्टे मारावेत आणि मोठ्या वाहनांसाठी योग्य व सुरक्षित वळणाची व्यवस्था करावी. त्याचबरोबर बेकायदा बाजार, टपऱ्या आणि हातगाड्यांकडून कथितपणे होणाऱ्या वसुलीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी. जर शासकीय यंत्रणेतील कोणाचा या कथित वसुलीशी संबंध आढळला, तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी उरणच्या जनेतेकडून होत आहे.
वाहतूक कोंडीचा भडका उडणार
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या काळात उरण शहरात भाविकांची, वाहनांची आणि सार्वजनिक वाहतुकीची मोठी वर्दळ वाढणार आहे. अशा परिस्थितीत चारफाट्यावर बेकायदा बाजार, टपऱ्या, हातगाड्या आणि रस्त्यावर उभी केली जाणारी वाहने कायम राहिली, तर उत्सवाच्या काळात वाहतूक कोंडीचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाने जागे होण्यापेक्षा आत्ताच जागे होऊन चारफाटा मोकळा करणे अत्यावश्यक बनले आहे.
बेकायदा धंद्यांना लाल दिवा दाखवा
उरण चारफाटा हा जनतेच्या वाहतुकीचा मार्ग आहे; तो कोणाच्या वसुलीचा अड्डा होऊ देऊ नका. सिग्नलला हिरवा दिवा दाखवायचा असेल, तर आधी बेकायदा धंद्यांना लाल दिवा दाखवा. गणेशोत्सवाच्या गर्दीपूर्वी चारफाटा मोकळा करा, अन्यथा वाहतूक कोंडीचा हा खेळ प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सुरूच राहील. तसेच, ‘वसुली झाली की कारवाई थांबते?’ हा प्रश्न आता चारफाट्यावर चर्चेचा विषय बनला आहे. अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना मोकळे रान मिळत असेल, तर प्रशासनाचा धाक नेमका कुठे गेला? असा संतप्त सवाल जनतेतून केला जात आहे.
