सभेला भाजपच्या सदस्यांची दांडी
| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण नगर परिषदेच्या सत्ताधारी मविआने अंदाजित अर्थसंकल्पाच्या मंजुरीसाठी बोलाविलेली विशेष सभा नुकतीच पार पडली. मात्र, या विशेष सभेकडे भाजपच्या 12 सदस्यांनीही पाठ फिरविली. कोरमअभावी अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली नाही. मात्र, सभागृहात नगराध्यक्षांनी विशेष अधिकाराचा वापर करून 2026-27 या वर्षातील 98 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करून अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी दिली.
उरण नगर परिषदेचा अंदाजित अर्थसंकल्प 28 फेब्रुवारीपर्यंत मंजूर करून घेण्याचे आदेश शासनाने दिले होते. या आदेशानुसार नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी शुक्रवारी (दि.27) स्थायी समिती व विशेष सभा बोलावली होती. मात्र, विशेष अर्थसंकल्पाच्या सभेआधीच मुख्याधिकारी समीर जाधव हे मंगळवारपासून (दि.24) रजेवर गेले आहेत. त्यांच्याजागी अन्य मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनीही मुख्याधिकारीपदाचा तात्पुरता भार नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र घाडगे यांच्याकडे सोपविला आहे. दरम्यान, शुक्रवारी नगराध्यक्षांनी बोलाविलेल्या स्थायी समिती व विशेष सभा या दोन्ही बैठकांसाठी भाजपचे 12 सदस्यही उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे सभागृहात कोरमअभावी 2026-27 या वर्षातील 98 कोटींच्या अर्थसंकल्पाची विशेष सभा तहकूब करण्यात आली असल्याची माहिती नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र घाडगे यांनी दिली. तर, स्थायी समिती व विशेष सभेत अर्थसंकल्पाच्या मंजूरीची पुर्णपणे जबाबदारी नगराध्यक्षांचीच आहे. त्यामुळे भाजप सदस्यांच्या स्थायी समिती, उपस्थिती, गैरउपस्थितीचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे उपनगराध्यक्ष रवि भोईर यांनी दिली. त्यामुळे विशेष अधिकाराचा वापर करून अर्थसंकल्प सभागृहात मंजूर करून घेण्यात आला. तसेच, हा अर्थसंकल्प अंतिम मंजुरीसाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी दिली.
