। उरण । वार्ताहर ।
सायबर गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्याबाबत विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना पुरेपूर माहिती देण्यासाठी उरण पोलीस ठाण्याच्यावतीने गुरुवारी (दि.3) सायबर गुन्ह्यासंदर्भात मार्गदर्शनात्मक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उरण न्यायालयाचे सरकारी वकील प्रतिक देशपांडे, न्हावा शेवा पार्ट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल नेहुल, उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ, पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी प्रियांका पाटील यांनी मार्गदर्शन केले.
इंटरनेट क्रांती ही आजवरीची सर्वात मोठी क्रांती मानली जाते. इंटरनेटने सर्वत्र क्षेत्रात प्रवेश केला आहे. ऑनलाईन बॅकींग, खरेदी, मेसेजींग, ई-गव्हर्नस, सामाजीक माध्यमे, व्हीडीओ कॉल इत्यादी गोष्टींमुळे देशाच्या सिमारेषा पुसून गेल्या असून जगातले लोक खूप जवळ आले आहेत. वाढत्या इंटरनेटच्या वापराबरोबरच सायबर गुन्हेगारांनी गुन्हेगारीच्या नवनवीन पद्धती शोधून लोकांचा पैसा आणि खासगी गोपनियतेला मोठा धोका निर्माण केला आहे. इंटरनेटचे तंत्रज्ञान वारंवार बदलत असल्यामुळे सायबर गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आवाहन आहे. त्याचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ट्रान्सफोरमिंग महाराष्ट्र या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकांनी सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती अभियान राबविण्याचे निश्चित केले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.