। उरण । वार्ताहर ।
उरण नगरपालिकेने धोकादायक इमारती जाहीर केल्या आहेत. पैकी शहरातील इमारतीमध्ये पोस्टाचे कार्यालय सुरू आहे. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वरिष्ठ अधिकार्यांनी पोस्ट कार्यालयाचे लवकरात लवकर स्थलांतर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सदर इमारत नगरपालिकेने धोकादायक इमारत दिल्याने कर्मचारी वर्ग जीवावर उदार होऊन काम करीत आहे.
इमारतीमधील काही ठिकाणचा भाग अचानक कोसळत आहे. पोस्ट कार्यालय उघडल्यानंतर जनतेची गर्दी होते, विशेषतः लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची जास्त गर्दी दिसते. पोस्टाचे दर कमी असल्याने मनिऑर्डर, रजिस्टर पोस्ट, स्पीड पोस्ट, बचत खाता, साधारण पोस्टसाठी जनतेचा ओढा वाढत चालला आहे.
उरण शहरात गिरीराज सोसायटीच्या इमारतीत पोस्ट कार्यालय कार्यरत आहे. सदर इमारत धोकादायक झाली असल्याने नगरपालिकेने तसे जाहीर करून सोसायटीला लेखी पत्र देऊन त्वरित खाली करण्यास सांगितले आहे.
सोसायटीने त्वरित या पत्राची दखल घेऊन कार्यवाहीस सुरवात केली. त्याआधी इमारतीमधील काही भागांना चिरा गेल्या आहेत, तर काही ठिकाणचा स्लॅब पडला आहे. यामुळे सोसायटीमधील बहुतांश सदनिका धारकांनी सदनिका खाली केल्या आहेत. दोन तीन महिन्यापासून पाठपुरावा सुरू असूनही पोस्ट कार्यालय स्थलांतरित न झाल्याने पोस्ट कार्यालयातील कर्मचारी व ग्राहक जीव मुठीत धरून येत असतात. याची दखल न घेतल्याने भविष्यात एखादी दुर्घटना घडली तर त्याला गिरीराज सोसायटी जबाबदार न रहाता पोस्ट कार्यालय जबाबदार राहील, असे सोसायटीच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.