अबब.. आठ फुटी उंचीचा शेवळूं!

जेएनपीटी | वार्ताहर |
पावसाळा सुरू झाला की जंगलात उगवणारी शेवळा ही भाजी आहे. पावसाळ्यात आदिवासी बांधव ही भाजी गोळा करून ती विकतात. साधारणपणे एक ते दिड फुट लांबी पर्यंत ती वाढते. पण चिरनेर येथील एका शेतकर्‍याला चक्क आठ फूट लांबीचे शेवळू सापडल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

काशिनाथ खारपाटील हा शेतकरी आणि निसर्ग मित्र डोंगरात फिरताना त्याला हे शेवळू आढळले. सुरूवातीला त्याना हे कुठलेतरी वेगळ झाड आहे असे वाटले. मात्र जवळून निरखून पाहिले असता ते शेवळाचे झाड असल्याचे त्यांना लक्षात आले. कुतूहूल म्हणून त्यानी ते शेवळू कापून घरी आणले. हे शेवळाचे झाड पहाण्यासाठी अनेकांनी काशिनाथ खारपाटील यांच्या घरी हजेरी लावली आणि हे शेवळू पाहून आश्‍चर्य व्यक्त केले. अनेक जेष्ठ शेतकर्‍यांनी देखिल या बाबत आश्‍चर्य व्यक्त करत आमच्या हयातीत एवढ मोठ शेवळू पाहिले नसल्याचे सांगितले.

डोंगर आणि जंगलात आढळणारी ही भाजी पावसाळ्यात कोकणात मोठ्या प्रमाणात उगवते. अतिशय औषधी भाजी म्हणून कोकणातील लोक ही भाजी खातात. या भाजीची चव अतिशय वेगळी असते. घशाला खवखवते. त्यामुळे काही लोकांना ही भाजी आवडत नाही. मात्र या भाजीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे कोकणातील शेतकरी आवडीने ही भाजी खातात. साधारणपणे 20 रूपयांना एक जुडी या प्रमाणे विकली जाते. या सोबत काकडं नावाचं फळ दिले जाते. ती फळ भाजीमध्ये टाकल्यानंतर घशाला खवखवत नाही.

Exit mobile version