उरण शेकापचा स्तुत्य उपक्रम; विधवांना मिळाला हळदीकुंकवाचा मान

मोरश्‍वर भोईर यांच्या पुढाकाराने कार्यक्रम

| उरण | वार्ताहर |

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मोरेश्‍वर भोईर यांच्या पुढाकारातून उरण डाऊरनगर येथील आदिवासी वाडीवरील विधवा महिलांचा हळदीकुंकू देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम एसटी स्टँडच्या ऑफिसजवळ आयोजित करण्यात आला होता.

यावेळी मार्गदर्शन करताना मोरेश्‍वर भोईर म्हणाले की, गेली पाच वर्षे विधवा महिलांसाठी हा कार्यक्रम करीत आहोत. विधवा स्रियांना समाजात मानाचे स्थान मिळाले पाहिजे, त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी शेकाप नेहमीच कटिबद्ध आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सीमा घरत, तर प्रमुख पाहुणे म्हणून शहर चिटणीस शेखर पाटील, कामगार नेते नयन म्हात्रे, सहचिटणीस यशवंत ठाकूर, चाणजे माजी उपसरपंच प्रदीप नाखवा, पदाधिकारी शंकर भोईर, शहर अध्यक्षा नयना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी 75 विधवा आदिवासी महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. सर्व महिलांना सहावारी व नऊवारी साडी वाटप करण्यात आले. तसेच वुमनमन क्लबच्या वतीने तिळगुळ वाटप करण्यात आले. यावेळी महिलांना शासकीय योजनांची माहिती नयन म्हात्रे यांनी दिली.

आपण विधवा असलात तरी मनात शंका आणू नये, आपण देवाच्या लेकी आहोत, आपण रोज सकाळी देवाला हळदीकुंकू लावतो, मग अशाप्रसंगी अशा समारंभात आपण सहभागी झाले पाहिजे. लेक लाडकी अभियानांतर्गत बालवाडीच्या शिक्षिका करुणा घरत यांनी माहिती दिली. या कार्यक्रमाचे नियोजन मनीष कातकरी, लहू शिंदे, मुकरी यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र म्हात्रे यांनी केले.

Exit mobile version