। उरण । वार्ताहर ।
तालुका म्हणजे ‘आओ जावो घर तुम्हारा’ असे चित्र गेल्या काही वर्षांपासून दिसत आहे. या पार्श्वभूमीवर द्रोणागिरी नोडमधील नवघर सर्कल ते खोपटा पूल आणि खोपटा पूल ते पंजाब वेअर हाऊस रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात भंगारवाल्यांनी आपले बस्तान बसविले असल्याचे चित्र आहे.
नवघर सर्कलपासून काही आंतरावर असलेल्या भंगारवाल्याने तर सिडकोच्या अखत्यारीतील रस्त्याचा फुटपाथच गायब केला आहे. त्यानंतरही सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून संबंधितावर कारवाई कशी होत नाही. या ठिकाणी भंगारचे दुकान आणि आपल्या गावाकडून माणसे आणून त्यांना त्या ठिकाणी बसवीत आहे. सिडकोसह पोलीस किंवा अन्य कुणीही त्याच्यावर कारवाई करतांना दिसत नाहीत.
अनेकजण आपल्याकडे येऊन चहा घेऊन जातात. त्यामुळे आपल्यावर कारवाई होण्याचा प्रश्नच नसल्याचे सूतोवाच या येथील एका भंगारवाल्याकडून केले जात असल्याचे चर्चा आहे. बर्याच ठिकाणी अशा भंगाराच्या दुकानांच्या जमिनी खालून ज्वलनशील पदार्थ वाहून नेणार्या वाहिन्या गेल्या आहेत. त्यामुळेच अशा भंगारच्या दुकानांमध्ये होणारा एखादा अपघात देखील उरणकरांसाठी अगदी खतरनाक ठरू शकतो. त्यामुळे ज्या सिडकोच्या जागांवर हे अशे परप्रांतीय भंगारवाले बसले आहेत. त्यांच्यावर सिडकोच्या अतिक्रमण विरोधी विभागाकडून कारवाईचा दांडू कधी फिरवणार, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे.
उरण तालुक्यातील विविध शासकीय मोकळ्या जागा आपल्या बापजाद्यांच्या असल्याच्या अविर्भावात परप्रांतीयांनी बळकावल्या आहेत. उरण शहराला लागून असलेल्या बोरी पाखाडी परिसरात गेल्या काही वर्षात भंगारवाल्यांनी आपले मिनी कुर्ला वसविण्याचे घाटले आहे. या ठिकाणी अनेक शासकीय जागांवर या भंगारवाल्यांनी आपली बेधडक भंगाराची गोदामे उभारली असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे हे बहुतांशी भंगारवाले अनधिकृतपणे या ठिकाणी वास्तव्य करीत असल्याचे माहिती असून देखील उरण नगरपरिषदेने या भागात काही ठिकाणी पक्क्या स्वरूपाचे सिमेंटचे रस्ते तयार केले असल्याचे भयंकर चित्र या ठिकाणी पाहायला मिळते.
शहराची ही अवस्था असताना सिडको बाधित द्रोणागिरी नोड, नवघर विभाग, खोपटा पूल ते पंजाब वेअर हाऊस फाटा या बहुतांशी ठिकाणी भंगारवाल्यांनी सिडकोचे रस्ते आपल्याच पूर्वजांचे असल्याच्या अविर्भावात आपली दुकाने थाटली आहेत. सिडकोचे अतिक्रमण विरोधी पथक स्थानिकांच्या गरजेपोटीच्या घरांवर कारवाई करण्यासाठी धावत येत असताना त्यांना या परप्रांतीय भंगारवाल्यांची ही भली मोठी सिडकोच्या रस्त्यांवर फुटपाथ खाऊन उभारलेली भंगाराची दुकाने मात्र दिसत नाहीत, अशी स्थिती आहे. या परिसरात रात्रीच्या सुमारास काही वेगळा ही खेळ सुरू असल्यास त्याला देखील कोणाचाच अटकाव नाही. त्यामुळे या अनधिकृत परप्रांतीय भंगारवाल्यांवर सिडकोचा कारवाईचा हातोडा कधी फिरतो ते पाहावे लागणार आहे.