पोलीस ठाण्याला तीन तास घेराव; आमदार बालदींच्या गैरहजेरीची चर्चा
। उरण । वार्ताहर ।
उरणच्या सातरहाटी येथील यशश्री शिंदे हिच्या अमानवी हत्येनंतर उरणकरांनी उरण पोलीस ठाण्याला जवळपास तीन तास घेराव घातला होता. हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या उरणकरांनी यशश्रीच्या हत्येच्या निषेधार्थ एकच हलकल्लोळ केला. गर्दीतील नागरिकांची समजूत काढताना उरण पोलिसांची दमछाक झाली. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे तसेच न्हावा शेवाचे पोलीस सहाय्यक आयुक्त विशाल नेऊल यांनी अनेकदा आवाहन करूनही जमाव पोलीस ठाणे सोडायचे नाव घेत नव्हता. पोलीस ठाण्यात उपस्थित असलेले माजी आमदार मनोहर भोईर, प्रितम म्हात्रे, भावना घाणेकर, सीमा घरत यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही दाद दिली जात नव्हती. या घटनेचे भाजपच्या कार्यकर्त्यांनी राजकारण केल्याचे पहायला मिळाले. भाजपचे कार्यकर्ते या गंभीर घटनेतही श्रीरामाच्या घोषणा देत होते. जमावर अनावर होत असतानाही स्थानिक आमदार महेश बालदी यांचा कुठेच पत्ता नव्हता. अखेर आमदारांना जाब विचारण्याच्या इराद्याने जमाव हा आमदार बालदी यांच्या कार्यालयाकडे रवाना झाला. तेव्हा पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.
यशश्री शिंदे या तरुणीची दाऊद शेख या इसमाने अमानवी अत्याचार करत तिच्यावर तीक्ष्ण शस्त्राच्या सहाय्याने हत्या केली. या घटनेने उरण तालुक्यातील वातावरण प्रचंड संतप्त झाले. घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी यशश्रीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांकडे तगादा लावला. मात्र आरोपीला पकडून आणल्याशिवाय यशश्रीवर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, अशी ठाम भूमिका यशश्रीच्या नातेवाईकांनी घेतली. स्थानिक पोलीस अधिकार्यांनी यशश्रीच्या वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी आपला नकार कायम ठेवला. मात्र नंतर यशश्रीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनास्थळी काही व्यक्तींनी उरणचे आमदार महेश बालदी यांना याचा जाबही विचारला. यशश्रीच्या बहिणीने तर बालदी यांना असा अत्याचार तुमच्या मुलीवर झाला असता तर काय केले असते, असा सवाल केला. ही घटना सोशल मिडियावर वार्यासारखी पसरली.
या घटनेने संतप्त झालेल्या विविध संघटनांनी यशश्रीला श्रध्दांजली वाहण्यासाठी रविवारी महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ जमायचा निर्णय जाहीर केला. रविवारी मोठ्या संख्येने उरणकर गांधींच्या पुतळ्यापाशी जमू लागले. गांधी पुतळ्याजवळ हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती. यात महिलांची संख्या अभूतपूर्व होती. यावेळी माजी आमदार मनोहर भोईर, उरण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, भाजपचे तालुका अध्यक्ष रवी भोईर, शेकापच्या सीमा घरत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भावना घाणेकर, शिवसेनेचे नरेश रहाळकर यशश्रीला आदरांजली वाहत असताना अजित भिंडे याच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे 20-25 कार्यकर्ते श्रीरामाच्या घोषणा देत घटनास्थळी आले. या घोषणांनी घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. अनेकांनी घोषणा बंद करा अशी समज भाजपच्या कार्यकर्त्यांना दिली. मात्र तरीही या कार्यकर्त्यांनी आपला हेका सोडला नाही. उलट त्यांनी जिहादीच्या घोषणा द्यायला सुरुवात केली.
जमाव अनावर होत असल्याचे पाहून गोंधळ घालणार्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर जाण्याचा आग्रह धरला. उरण शहरातून जमाव पोलीस ठाण्यावर पोहोचला. पोलीस ठाण्यावरील गर्दी मोठ्याप्रमाणात वाढू लागली. हळूहळू ही गर्दी युसूफ फॅक्टरीपर्यंत वाढत गेली. माजी आमदार मनोहर भोईर यांच्यासह भावना घाणेकर, नरेश रहाळकर असे अनेकजण जमावाला समजावण्याचा प्रयत्न करत होते. सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल नेऊळ यांनी उपस्थितांना शांत राहण्याचे आवाहन केले. जमावाला ऐकू जावे म्हणून काहींनी स्पीकरचीही व्यवस्था केली. पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी उपस्थितांना समजावण्याचा प्रयत्न केला. आरोपीला कोणत्याही स्थितीत पकडून आणू, असे आश्वासनही त्यांनी दिले. यासाठी आवश्यक अशी पथकं परराज्यात रवाना झाल्याचेही पानसरे यांनी सांगत होते. पण जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
यातच भाजपचे कार्यकर्ते या घटनेचे राजकारण करत असल्याचे पहायला मिळाले. जय श्रीरामाच्या घोषणा येऊ लागताच जमाव आणखीच संतप्त झाला. अजित भिंडे याचा यात पुढाकार होता. विशेष म्हणजे राजेश ठाकूर या माजी नगरसेवकासह भाजपचे काही माजी नगरसेवक तसेच नगरसेविकाही या घोषणांची री ओढताना दिसत होते. गंभीर घटनेचे भाजप कार्यकर्त्यांकडून राजकारण केले जात असल्याचे दिसू लागताच उपस्थितांनी वदे मातरमच्या घोषणा सुरू केल्या. गांभीर्याने जमलेल्या उरणकरांनी भाजप कार्यकर्त्यांच्या या हुल्लडगिरीवर तीव्र संताप व्यक्त केला. यशश्रीवर अत्याचार झाल्याची घटना घडल्यावर काही सामाजिक संघटनांनी उरण बंदचे आवाहन केले होते. मात्र आमदारांच्या अधिपत्याखाली असलेल्या व्यापार्यांनी बंदला प्रतिसाद दिला नाही. याचाही राग जमावाने उघडपणे बोलून दाखवला. दुकाने बंद करा अशा घोषणा पुढे येऊ लागल्या. जमावाचा हा दबाव पाहून नंतर उरणमधील सारे व्यवहार बंद करण्यात आले.
एकीकडे हे सारे सुरू असताना दुसरीकडे स्थानिक आमदार महेश बालदी कुठेच दिसत नव्हते. त्यांच्या या अनुपस्थितीवर उपस्थितांनी जोरदार आक्षेप घेतला.
यशश्रीवर अंत्यसंस्कार करण्याची संमती दिल्याचा राग अनेकांनी महेश बालदी यांच्यावर व्यक्त केला. उलवे येथील शेकाप कार्यकर्ते राजेंद्र पाटील यांनी बालदी यांनी उलवे येथे मशीदीच्या बांधकामाला केलेल्या सहकार्याचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा बालदी समर्थक संतप्त झाले. अखेर हा जमाव बालदी यांच्या तुंगेकर बिल्डिंगजवळील कार्यलयाकडे रवाना झाला. तिथे आमदार आमच्या समोर आल्याशिवाय हटणार नाही, असा हेका जमावाने घेतला. बालदी जमावापुढे आल्यावर काहींनी त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. तशा श्रीरामाच्या घोषणा पुन्हा वाढू लागल्या. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून बालदी यांच्या कार्यालयाच्या परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली. सुमारे दीड तास जमाव बालदी यांना जाब विचारत होता. अखेर बालदी आपल्या समर्थकांसह पोलीस ठाण्यात रवाना झाले. दरम्यान रविवारी दुपारी भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी उरण सातरहाटी येथे यशश्रीच्या नातलगांची भेट घेऊन घडल्या घटनेची माहिती घेतली. मात्र नंतर त्यांनी पोलिसांची हुजरेगिरी करत आरोपीला पकडून आणून त्याला फासावर लटकवू असे सांगण्याचा प्रयत्न केला. पुढे तर त्यांनी आपल्या मुलींकडेही लक्ष द्या, असे सांगायलाही त्या कमी पडल्या नाहीत.