अनधिकृत ढाब्यांमुळे उरणकर संकटात

शासकीय जमिनींवर अतिक्रमण

| उरण | प्रतिनिधी |

उलवे प्रभाग 8 मध्ये शनिवारी (दि.22) पहाटेच्या सुमारास एका अनधिकृत ढाब्यातील सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली होती. या आगीत संपूर्ण ढाबा जळून खाक झाला होता. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी या घटनेने उरण-उलवे परिसरात वाढलेल्या बेकायदेशीर ढाब्यांचा प्रश्‍न गंभीर होत चालला आहे. ही आग केवळ अपघात नसून, अनधिकृत ढाब्यांना मिळणाऱ्या अदृश्य आशीर्वादाची जळजळीत साक्ष असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतो आहे.

उलवे-उरण-द्रोणागिरी विभागात सिडको, जेएनपीटी, पीडब्ल्यूडी, मेरिटाईम बोर्ड आणि इतर शासकीय जमिनींवर अनधिकृतपणे ढाबे, गोदामे आणि झोपडवस्त्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या सर्व बांधकामांना प्रशासकीय आशीर्वाद मिळाल्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण शक्यच नसल्याचा सर्रास आरोप स्थानिकांकडून होत आहे. तसेच, हप्ता देतात म्हणून ढाबे सुरू आहेत आणि हप्ता घेतात म्हणून कारवाई होत नाही, अशी देखील चर्चा स्थानिकांमधून सुरू आहे. त्यातच शनिवारी उलवे प्रभाग 8 मध्ये पहाटेच्या सुमारास एका अनधिकृत ढाब्यावरील सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली होती. काही क्षणांतच तो ढाबा ज्वाळांच्या भक्ष्यस्थानी सापडला. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील रहिवाशांची झोप उडाली. आगीचे उंच भडकणारे ज्वालामुखीसारखे रूप पाहून शेजारील उच्चभ्रू सोसायट्यांना गंभीर धोका निर्माण झाला. परिस्थिती गंभीर होत असल्याचे दिसताच नागरिकांनी तात्काळ सिडको अग्निशमन दलाला कळवले. अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रित केली. मात्र, ढाब्यातील सर्व साहित्य, संरचना आणि साहित्यसाठा पूर्णपणे नष्ट झाला असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. हा ढाबा पूर्णपणे अनधिकृत असल्याची पुष्टी स्थानिकांनी केली आहे. या आगीने राजकीय पातळीवरही खळबळ उडवली. शेकाप नेते राजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी तातडीने भेट देत प्रशासनावर तुफान टीका केली आहे.

या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, भविष्यात उलवेसारखी भीषण आग उरणमध्ये लागली तर त्याला जबाबदार कोणाला धरणार? अधिकाऱ्यांना, राजकारण्यांना की हप्तेखोर अंध व्यवस्थेला? अशा अनधिकृत ढाब्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे.

प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी
ही आग सध्या उलवेपुरती मर्यादित असली तरी उरणमध्येही अशाच प्रकारचे असंख्य अनधिकृत ढाबे रातोरात उभे राहत आहेत. सिडकोच्या जमिनीवर उभारलेल्या अनधिकृत ढाब्याने शेजारील हजारो नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनीही प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेकडो नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करून असे बेकायदेशीर ढाबे चालू देणे म्हणजे प्रशासन आणि काही राजकीय शक्तींच्या संगनमताने ‌‘उरणचा बारुदाचा ढिगारा' तयार केल्यासारखे आहे, असे संतप्त मत नागरिकांनी व्यक्त केले.
Exit mobile version