उरणकरांचे उपजिल्हा रुग्णालयाचे स्वप्न होणार साकार

उपचारासाठी मुंबई, नवी मुंबईत जावे नाही लागणार; 14 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर यश

| उरण । वार्ताहर ।

14 वर्षांपासून उरणमध्ये मंजूर झालेल्या उपजिल्हा रुग्णालयाची उरणकरांना प्रतिक्षा आहे. सोमवारी जिल्हा शल्यचिकित्सक, सिडको, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी यांनी रुग्णालयाच्या भूखंडाची पाहणी केली. त्यामुळे पुन्हा एकदा उरणच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.

उरणमधील वाढती वाहने व त्यामुळे होणारे अपघात, या अपघातात उपचाराविना जाणारे जीव. तसेच नागरिकांना उपचारासाठी मुंबई, नवी मुंबई व पनवेलची रुग्णालये गाठावी लागत होती. येथील रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुसज्ज रुग्णालय उभारण्याची मागणी करण्यात आली होती. याकरिता आंदोलन मोर्चे, उपोषण, आमरण उपोषण एवढेच नाही तर अखेर मुंबई उच्च न्यायालयात जनहीत याचीकाही दाखल करण्यात आली होती. एवढे करूनही हॉस्पिटल होईल या अपेक्षेने वाट पाहत आहेत.

त्याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या अलिबाग येथील जनता दरबारात उरण सामाजिक संस्थेच्यावतीने कॉ. भूषण पाटील, सरचिटणीस संतोष पवार यांनी लेखी तसेच तोंडी कैफीयत मांडली आणि केंद्र व राज्याचे अनेक अती संवेदनशील, अत्यंत ज्वालाग्राही पदार्थ हाताळणारे प्रकल्प त्याचप्रमाणे जेएनपीटी पोर्ट व त्यावर आधारित इतर पोर्ट यातून मिळणारा प्रचंड आर्थिक नफा आणि अद्ययावत सुविधा आरोग्य/तंत्रशिक्षण शुन्य याबाबत योग्य तो पाठपुरावा करून लवकरात लवकर 100 खाटाचे उप जिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन करण्याचा कार्यक्रम घेण्याचे सूतोवाच केले आहे.

प्रस्तावित रुग्णालयाच्या भूखंडाची पाहणी करताना इंदिरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बाबासो काळेल, सहाय्यक अधिक्षक अनिल ठाकूर, नगरसेवक ठाकूर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने उपस्थित होते.

Exit mobile version