| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यात प्रशासनाचे गांधीजींच्या तीन माकडांसारखे झाले आहे. त्यांना येथील समस्या ऐकायला येत नाही, ना ते बघत आहेत आणि त्यावर काही बोलतही नाहीत. अशी स्थिती तालुक्यात असल्यामुळे तालुक्यातील छोट्या-मोठ्या प्रश्नांसाठी सामान्य माणसांना आवाज उठविण्याची वेळ येऊन ठेपत आहे. अशातच उरण-पनवेल रस्त्यावरील फुंडे पुलावरून उत्तरेच्या बाजूला उतरताना भला मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यातून विशेषत: मोटार सायकलस्वार नेहमीच अपघातग्रस्त होत असतात. त्यामुळे सिडको आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारी वर्गाला एवढा मोठा खड्डा दिसत कसा नाही असा, प्रश्न प्रवासी वर्गाला पडला आहे.
उरण तालुक्यातील रस्ते हे यंदाच्या गणेशोत्सवात सर्वाधिक चर्चेत राहिले आहेत. रस्त्यांवरील खड्डे भरणी असू द्या किंवा खराब रस्ते दुरूस्ती करणे असो, त्यासाठी नागरिकांना आंदोलनात्मक पवित्राच घ्यावा लागला आहे. अशा आंदोलनांची राजकीय नेते मंडळींनी हाक दिल्यावरच यंत्रणा ठिकठिकाणी जागी झाल्याची उदाहरणे तालुक्यातील नागरिकांनी अनुभवली आहेत. सध्या नवघर सर्कल ते फुंडे हायस्कूल या मार्गावरील फुंडे कडील उतरणीवर एक भला मोठां खड्डा पडला आहे. मात्र, त्या खड्ड्याकडूे अजूनही लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी वर्गाचे लक्ष गेलेले दिसत नाही. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात नागरिकांना मात्र या खड्ड्यांचा दणका सहन करूनच आपला पुढचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळेच अधिकारी लोकांना हा खड्डा नक्की कधी दिसणार, हा प्रश्न पडला आहे.







