शेवंड 2 हजार, तर 2 हजार 600 रुपये किलो; विदेशातील वाढत्या मागणीमुळे दरात वाढ
| उरण | प्रतिनिधी |
उरण येथील नव्याने सुरु करण्यात आलेल्या करंजा बंदारामुळे शेवंडी आणि खेकड्यांना जागतिक बाजारपेठेत प्रचंड मागणी असून, त्यांच्या दरात वाढ झाली आहे. करंजा बंदरातून निर्यात होणार्या शेवंड 2 हजार, तर खेकडा 2 हजार 600 रुपये किलोप्रमाणे दर मिळत आहे. करंजा बंदरात मच्छिमारांकडून पकडण्यात येणार्या शेवंड (लॉबस्टर) आणि मोठ्या आकारांचे खेकडे यांना विदेशात मोठी मागणी असल्याने त्यांच्या दरात वाढ झाली आहे. यात किलोला 1 हजर 700 असलेला दर दोन हजार झाला आहे. तर खेकड्यांच्या दरातही वाढ झाली आहे.
याचा लाभ स्थानिक मच्छिमारांनाही होत आहे. त्यामुळे या नव्याने सुरु करण्यात आलेल्या करंजा येथील बंदरामुळे स्थानिक मच्छिमारांच्या व्यवसायाला अधिक चालना मिळत आहे. या बंदरात पकडण्यात आलेल्या शेवंडी आणि खेकड्यांना जागतिक बाजारात प्रचंड मागणी आहे. त्यामुळे सध्या या दोन्ही माशांची आवक कमी झाली आहे. परिणामी, या दोन्ही माशांचे दर वाढले आहेत. गेल्या काही वर्षांपासून शेवंडी किलोला 1200 ते 1700 रुपये असलेला दर 1900 ते 2 हजार रुपयांवर पोहोचला आहे.
भारताबाहेर मागणी
करंजामधील शेवंड आणि खेकडे हे अमेरिका, सिंगापूर यासह देशातील सात व पंचतारांकित हॉटेलमध्ये सर्व्ह केल्या जातात. अरबी समुद्र किनार्यावर वसलेल्या करंजा बंदर परिसरात अनेक छोटे मच्छिमार शेवंड आणि खेकडे पकडण्याचा व्यवसाय करीत आहेत. यासाठी मच्छिमारांना अनेक तास लागत आहेत. पारंपरिक मच्छिमारांना आर्थिक फायदा मिळवून देणारी आणि आखाती देशात मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या शेवंड (लॉबस्टर) आता मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे स्थानिक मच्छिमार अडचणीत आले आहेत.
शेवंडाचे मांस रुचकर
शेवंडाचे मांस अत्यंत रुचकर असून, खाण्यासाठी ते ताजे अथवा गोठवून वापरतात. देशभरातील पंचतारांकित हॉटेल आणि आखाती देशात या शेवंडीला मोठी मागणी आहे. मात्र, मोठ्या प्रमाणावर मागणी असली तरी समुद्रात मागील काही वर्षांपासून शेवंड मिळण्याच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. त्यामुळे स्थानिक मच्छिमारांकडूनही मागणी प्रमाणे शेवंडींचा पुरवठा होत नाही. परिणामी, पुरवठा होत नसल्याने मागणी असूनही निर्यात कंपन्यांना शेवंडींचा पुरवठा करणे शक्य होत नाही.