उरणची जलवाहतूक समस्यांच्या गर्तेत

| चिरनेर | वार्ताहर |

केंद्र सरकारने भूपृष्ठ वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी जलवाहतुकीला प्राधान्य दिले आहे. देशात जलवाहतूक वाढविण्यासाठी केंद्र सरकार नवनवीन योजना राबवत आहे. मात्र, उरण तालुक्यात वर्षानुवर्षे सुरू असलेल्या जलवाहतुकीला समस्यांचे ग्रहण लागले असून, या जलवाहतुकीत प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.

उरण तालुक्यात मोरा ते भाऊचा धक्का, करंजा ते रेवस तर जेएनपीटी ते गेटवे ऑफ इंडिया अशी प्रवासी जलवाहतूक सेवा सुरू आहे. या तिन्ही ठिकाणावरून हजारो प्रवासी ये-जा करीत असतात. यापैकी मोरा ते भाऊचा धक्का आणि करंजा ते रेवस ही सेवा कित्येक वर्षांपासून सुरू आहे. या जलवाहतुकीमुळे उरणकरांना मुंबई आणि जिल्ह्याचे ठिकाण अलिबाग हे अंतर जवळचे झाले आहे. सध्या या दोन जलवाहतूक सेवा समस्यांच्या गर्तेत सापडल्या असून, मेरीटाईम मंडळाचे आणि प्रशासनाचे प्रवाशांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

करंजा आणि मोरा बंदरात ज्या ठिकाणी बोटी लागतात त्या ठिकाणी जेटीवर प्रचंड प्रमाणात गाळ साचल्यामुळे ओटीच्या वेळी होड्या धक्क्यावर लावता येत नाही. धक्क्याच्या परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणात गाळ आहे की, कधी कधी या बोटी समुद्राच्या मध्यात थांबविण्याची नामुष्की मच्छिमारांवर येते. करंजा येथील नव्याने झालेल्या बंदराच्या भरावाचा आणि रो-रो सेवेच्या भरावाचा गाळ येथे साचला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. हा गाळ काढण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे टेंडर दरवर्षी काढण्यात येते. मात्र, हा काढलेला गाळ पुन्हा याच ठिकाणी आणून टाकला जातो. जेएनपीटीच्या चौथ्या बंदराच्या भरावामुळे चिखल आणि गाळ साचलेला आहे.

करंजा-रेवस ही सेवा उरणकरांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. मात्र, या बंदरात गाळाची समस्या नेहमी प्रवाशांना सतावत असते. येथे प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या शौचालयाच्या जागांवर काही स्थानिकांनी अतिक्रमण केले असल्यामुळे महिलावर्गाचे मोठे हाल होतात. निवाराशेड नसल्यामुळे प्रवाशांना ऊन पावसात उभे राहून बोटीची वाट पाहावी लागते.

हेमंत गौरीकर
माजी संचालक, करंजा मच्छिमार सोसायटी
Exit mobile version