कोळी बांधवांना उध्वस्त करण्याचा डाव
जागा मोजणी करून घालणार तारेचे कुंपण; कोळीबांधवांनी केला मोजणीला विरोध
| रायगड | प्रतिनिधी |
थळ समुद्र किनाऱ्यावरील शासकीय जागेच्या मोजणीच्या प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक आमदारांच्या ग्रामपंचायतीमध्ये असणारे हे गुरुचरण मोजून या जागेला तारेची भिंत उभारण्यात येणार आहे. पोलीस बळाचा वापर करून ग्रामपंचायतीने गुरुचरणाची जागा मोजणी सोमवारी सुरू केली. त्यामुळे जागा मोजणी करून ती धनदांडग्यांच्या स्वाधीन करण्याचा डाव स्थानिक प्रशासनाने आखला असल्याचा आरोप कोळी बांधवांनी केला आहे. या जागेत असणारे कोळी समाजाचे मासळी सुकविण्याचे सिमेंटचे ओटे आणि मातीची अंगणे या मोजणीमुळे उदध्वस्त होणार असून कोळी बांधवांच्या उदरनिर्वाहाचे साधन हिरावले जाणार आहे.
अलिबाग तालुक्यातील थळ समुद्र किनाऱ्यालगत कोळी बांधवांनी गुरुचरण जागेत मासळी सुकविण्यासाठी सुरुवातीला मातीची अंगणे तयार केली होती. यानंतर काही कोळी बांधवांनी सिमेंटचे ओटे तयार केले. याठिकाणी मासळी सुकवून उदरनिर्वाह करणाऱ्या कोळी बांधवांच्या मासळी सुकविण्याच्या जागेवर धनदांडग्यांच्या नजरा वळल्या आहेत. गुरुचरणाला लागून असणाऱ्या फार्महाऊसची शोभा बिघडेल यासाठी ही जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न अनेकदा झाला आहे. गुरुचरणाची जागा मोजणी करण्यासाठी अनेकदा पोलीस फौजफाटा मागविण्यात आला आहे. यापूर्वी दोन वेळा मोजणी करण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न केला होता. त्यावेळी जेसीबीच्या सहाय्याने काही सिमेंटचे ओटे खोदण्यात आले होते. स्थानिकांनी पोलीस बळाला न घाबरता जागा मोजणी आणि कुंपण घालण्यास तीव्र विरोध केला होता. पोलीस बंदोबस्त असतानादेखील ग्रामपंचायतीला मोजणीतून माघार घ्यायला लागली होती.
सोमवारी गुरुचरण जागेची मोजणी करण्यासाठी ग्रामपंचायतीने पोलिसांना पाचारण केले होते. गावातील ग्रामस्थांची गुरुचरण मोजणीची मागणी आणि ओटे हटविण्याची तक्रार असल्याचे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि कर्मचाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी गुरुचरणाची मोजणीची सुरुवात कोळीवाडा परिसरातून करण्यात आली होती. यावेळी ग्रामपंचायतीने थळ बाजार समुद्र किनारी असणाऱ्या शासकीच जागेपासून करण्यास सुरुवात केली. कोळीवाडा ग्रामस्थांनी तेथे जाऊन मोजणी करणाऱ्यांना हटकले आणि मोजणी करण्यास विरोध केला.
आम्ही जगायचे कसे; महिलांचा सवाल
थळ बाजार किनाऱ्यापासून सुरू झालेली मोजणी हळूहळू कोळीवाडा परिसराकडे सरकू लागल्यानंतर कोळी बांधव जमा होऊ लागले. काही ग्रामस्थांनी पोलीस आणि ग्रामपंचायत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जमीन मोजणीला विरोध केला. परंपरागत मासळी सुकविण्याचे ओटे आणि अंगणे हिरावून घेतली तर आम्ही मासळी कुठे सुकवायची? असा सवाल ग्रामस्थांनी केला. पावसाळ्यात जागेची मोजणी होत नाही मग आता अचानक ही मोजणी का लावली. आमचे संसार आणि उदरनिर्वाहाचे साधन आमच्याकडे उरले नाही तर आम्ही जगायचे कसे, असा भडिमार ग्रामस्थांनी केला. असे असतानाही शासकीय गुरुचरणाची जागा मोजणी न थांबविता पूर्ण करण्याचा सपाटा मोजणी करणाऱ्या यंत्रणेने लावला होता.
जागा मोजणी कोळी बांधवांच्या जीवावर
मोजणी करताना मोजणी अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले. पोलिसांनी मध्यस्ती केल्याने मोजणी पुन्हा सुरू झाली. कोळी बांधवांच्या ओट्याच्या जागेची मोजणी करता मग धनदांडग्यांच्या वाड्यांची शेवटची हद्द देखील मोजावी. स्थानिक आमदाराच्या सांगण्याने सुरू केलेली मोजणी कोळी बांधवांच्या जीवावर उठणारी आहे. असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला.