| तळा | वार्ताहर |
तळा पोलीस ठाणे हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग एनएच 548ए वरिल रस्त्यावर तारस्ते गावाच्या नजीक मोठमोठे खड्डे पडल्याने या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. आगामी येत असलेल्या गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर चाकरमानी मोठ्या प्रमाणावर गावी परतत असतात अशावेळी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहतुकीस अडथळा होऊन अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने तळा पोलीस ठाण्याकडून वारंवार मा.उप कार्यकारी अभियंता महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, बांद्रा मुंबई येथे सदरच्या रस्त्यावरील खड्डे बुजवून घ्यावे यासाठी लेखी पत्र व्यवहार करुन तसेच त्यांच्या कार्यालयाच्या वारंवार सम्पर्कात राहून गणेशोत्सवापूर्वी लवकरात लवकर काम करून देण्याबाबत विनंती करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन संबंधित कार्यालयाकडून सदर रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम शनिवार पासून सुरू करण्यात आले आहे. या कामाची पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांनी पाहणी करून गणेशोत्सवापूर्वी कामास सुरुवात केल्याने संबंधित विभागाचे आभार व्यक्त केले.