| माथेरान | वार्ताहर |
माथेरान या जवळपास चार हजार लोकसंख्या असणार्या पर्यटनस्थळी विविध धर्माच्या स्मशानभूमी आहेत. हिंदू घटकांची संख्या अधिक असून, सदर हिंदू स्मशानभूमी गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असल्याने पावसाळ्यात मयत नेताना खूपच त्रासदायक बनते. परंतु, नुकताच मागील वर्षी मिशन माथेरान ग्रुपच्या माध्यमातून बदलापूर येथील संस्थेच्यावतीने शववाहिनी देणगी स्वरूपात प्राप्त झाल्यामुळे मयताच्या खांदेकर्यांना तूर्तास तरी सुटका मिळाली आहे.
ह्या स्मशानभूमीत काही वर्षांपूर्वी अंत्यसंस्कार वेळी लाकडाचा तुटवडा भासू नये यासाठी डिझेलवर चालणारी शवदाहिनीसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. सुरुवातीला काही महिने उत्तम सुविधा उपलब्ध झाली होती; परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्यानंतर सद्यःस्थितीत ही शवदाहिनी बंद अवस्थेत असल्याने जवळपास लाखो रुपये पाण्यात गेल्यासारखे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. स्मशानभूमी जंगल भागात कड्यालगत असल्याने काहीसा भाग पावसाळ्यात कोसळला आहे. लवकरच यावर उपाययोजना केली नाही तर भविष्यात हळूहळू संपूर्ण भाग कोसळण्याची भीती नाकारता येत नाही. अंत्यसंस्कार करण्यात येणारे शेड जीर्ण झाले असून, विशेषतः पावसाळ्यात निवार्याची सोय उपलब्ध नसल्याने तसेच बसण्यासाठी बाके नाहीत, त्यामुळे मयताच्या अंत्यसंस्कार वेळी उपस्थितांना पावसात उभे राहावे लागत आहे. सदरची स्मशानभूमी गावापासून खूपच लांब असल्याने ग्रामस्थांनी संबंधित खात्यांना स्मशानभूमी गावाच्या मध्यवर्ती भागात घ्यावी याबाबत अनेकदा लेखी निवेदने दिलेली आहेत.