गावठी वालाच्या शेंगांचा हंगाम सुरू

ग्राहकांकडून खरेदीसाठी गर्दी

| चिरनेर | वार्ताहर |

उरण तालुक्यात सध्या वालाच्या शेंगांचा हंगाम सुरू झाला आहे. काही दिवसांपासूनच गावठी वालाच्या शेंगा बाजारात येऊ लागल्याने ग्राहकांकडून खरेदीसाठी गर्दी होत आहे. वालाच्या शेंगा व चवळीच्या शेंगांसाठी थंडीचा हंगाम खूप उपयुक्त आहे. थंडीत पडणार्‍या दवावर हे पीक तयार होते. जेवढी जास्त थंडी, तेवढे हे पीक मोठ्या प्रमाणावर येते. दरम्यान, सदरील पिके तयार होण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागतो.

उरण तालुक्यातील चिरनेर परिसरात येणार्‍या ग्रामीण भागातील कळंबुसरे, कोप्रोली, नागाव, केगाव, साई, दिघाटी, केळवणे, खारपाडा या परिसरातील गावात हे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या पिकासाठी जास्त मेहनत नाही. परंतु, या पिकाचा सुगंध वन्य प्राण्यांना आकर्षित करत असतो. वालाची झुडपे हे जंगली वानरे आणि रानटी डुकरे तसेच गुरे यांचे आवडते खाद्य असल्यामुळे या प्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकर्‍यांना खूप मेहनत घेऊन शेताची राखण करावी लागते. वाल व चवळीच्या शेंगांचा फायदा किमान 70 ते 80 हजार रुपयांच्यावर मिळतो. परंतु, चिरनेर परिसरात जंगली वानरे व उनाड गुरे यांनी येथील शेतकर्‍यांना हैराण केले आहे. त्यामुळे बर्‍याच शेतकर्‍यांनी वाल, चवळीची पिकती शेती असूनदेखील ती ओसाड ठेवली आहे.

जे काही शेतकरी वाल, चवळीची शेती पिकवित आहेत, त्यांना या पिकांचे संरक्षण करण्यासाठी रात्रंदिवस शेतावरच मुक्काम ठोकावा लागत असल्याचे येथील शेतकरी कृष्णा म्हात्रे, कल्पेश म्हात्रे, समीर म्हात्रे, हरिश्‍चंद्र गोंधळी यांनी सांगितले. यावेळी कृषी मित्र प्रफुल्ल खारपाटील यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी सांगितले की, सर्व शेतकर्‍यांनी भातपीक घेतल्यानंतर आपली शेती ओसाड न ठेवता वाल, चवळी, हरभरा, मुग तसेच अन्य कडधान्यांचे पीक घेतले पाहिजे. यात खूप मोठा फायदा आहे. मात्र, या पिकांवर जंगली वानरांची व जंगली उनाड गुरांची वक्रदृष्टी असल्यामुळे येथील शेतकरी दरवर्षी लाखो रुपयांच्या उत्पादनाला मुकत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पोपटीसाठी अधिक मागणी
सध्या पोपटी करण्याचा हंगाम सुरू झाला असून, लोक गावठी हिरव्यागार वालाच्या शेंगांची खरेदी करण्यासाठी चिरनेर परिसरातील गावागावात येत आहेत. सध्या वालाच्या व चवळीच्या गावठी शेंगांना प्रचंड प्रमाणावर मागणी असून, येथे चवळीच्या शेंगांचा एका किलोचा दर शंभर रुपये तर वालाच्या शेंगांचा एका किलोचा दर दीडशे रुपये असा आहे. तरीही खरेदी करण्यास येणारे बाहेरचे ग्राहक आनंदाने या शेंगांची खरेदी करत असून, गावठी वालाच्या शेंगांची विशिष्ट प्रकारची चव चाखत आहेत.

Exit mobile version