। चिरनेर । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यात सध्या वालाच्या शेंगांचा हंगाम सुरू झाला आहे. काही दिवसापासूनच गावठी वालाच्या शेंगा बाजारात येऊ लागल्याने, ग्राहक वालाच्या शेंगा घेण्यास आतुर झाले आहेत. वालाच्या शेंगा व चवळीच्या शेंगांसाठी थंडीचा हंगाम खूप उपयुक्त आहे.
उरण तालुक्यातील चिरनेर परिसरात येणार्या ग्रामीण भागातील कळंबुसरे, कोप्रोली, नागाव, केगाव, साई, दिघाटी, केळवणे, खारपाडा या परिसरातील गावात हे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या पिकासाठी जास्त मेहनत नाही. परंतु या पिकाचा सुगंध वन्य प्राण्यांना आकर्षित करत असतो. वालाची झुडपे हे जंगली वानरे आणि रानटी डुकरे तसेच गुरे यांचे आवडते खाद्य असल्यामुळे या प्राण्यांना त्या पिकांपासून वंचित करण्यासाठी येथील शेतकर्यांना खूप मेहनत घेऊन, शेताची राखण करावी लागते. वाल व चवळीच्या शेंगांचा उत्पन्नाचा फायदा किमान 80 ते 90 हजार रुपयांच्यावर मिळतो .परंतु चिरनेर परिसरात जंगली वानरे व उनाड गुरे यांनी येथील शेतकर्यांना हैराण केले आहे. त्यामुळे बर्याच शेतकर्यांनी वाल चवळीची पिकती शेती असून देखील, शेती ओसाड ठेवली आहे. यात जे काही शेतकरी वाल चवळीची शेती पिकवित आहेत .त्यांना या पिकांचे संरक्षण करण्यासाठी रात्रंदिवस शेतावरच मुक्काम ठोकावा लागत आहे. तेव्हा कुठे हे पीक आमच्या हाती लागत आहे, असे येथील शेतकरी कृष्णा म्हात्रे, कल्पेश म्हात्रे, समीर म्हात्रे, हरिश्चंद्र गोंधळी यांनी सांगितले. यावेळी कृषी मित्र प्रफुल्ल खारपाटील यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी सांगितले की, सर्व शेतकर्यांनी भात पीक घेतल्यानंतर आपली शेती ओसाड न ठेवता वाल, चवळी, हरभरा, मुग तसेच अन्य कडधान्यांचे पीक घेतले पाहिजे. मात्र या पिकांवर जंगली वानरांची व जंगली उनाड गुरांची वक्रदृष्टी असल्यामुळे येथील शेतकरी दरवर्षी लाखो रुपयांच्या उत्पादनाला मुकत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सध्या पोपटी करण्याचा हंगाम सुरू झाला आहे.