पोलीस प्रशासनाची बघ्याची भूमिका; जमीन मालक न्यायाच्या प्रतीक्षेत
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील नेरळ-कळंब रस्त्यावरील धामोते गावातील मालकी जागेत अतिक्रमण केले जात आहे. संबंधित जमीन मालक वृद्ध असल्याने त्याचा फायदा घेतला जात आहे. त्याबाबत जमिन मालक व भाडेकरू यांनी कोल्हारे ग्रामपंचायत आणि नेरळ पोलिसांकडे दाद मागण्यात आली आहे. दरम्यान, त्या जमिनीवरील भाडेकरूला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. त्याची देखील तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली असून, पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचे आरोप त्यांच्याकडून होत आहेत.
दिपाली गंध्रे यांची धामोते गावात स्वतःच्या मालकीची जागा आहे. त्या जागेवर 25 ते 30 वर्षांपासून भाडेतत्वावर गॅरेज सुरू आहे. असे असताना देखील समोरच आडवे गाळे बांधून गॅरेजचा मुख्य रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे गॅरेजमध्ये काम करणार्या लोकांच्या रोजगारावरही गदा आली आहे. दिपाली गंध्रे यांच्या असहायतेचा फायदा घेत याठिकाणी दमदाटीने अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचा अरोप त्यांच्यांकडून होत आहे. त्याबाबत दिपाली गंध्रे आणि त्यांचा भाडेकरू लैला काझी (63) यांनी प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. तरी देखील त्यांना धमक्या मिळत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, पोलीस प्रशासन तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून बेकायदेशीर बांधकाम थांबवावे आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पीडित महिलांनी केली आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे न्याय मिळवण्यासाठी सामान्य नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. हे या घटनेतून स्पष्ट होत असल्याची चर्चा होताना दिसत आहे. त्याबाबत कोल्हारे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी यांच्याशी कृषीवलच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी संबंधिताला नोटीस देणार असल्याचे सांगितले आहे. तर, संबंधित पोलीस अधिकार्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत एक प्रकारे अनधिकृत बांधकाम करणार्या व्यक्तीला पाठिंबाच असल्याचे दर्शविले आहे. त्यामुळे या पीडित महिलांना न्याय मिळेल का? याबाबत शंका उपस्थित होत आहे.
याबाबत मंडळ अधिकार्यांना आदेश दिले असून योग्य तो पंचनामा करून महिलेला न्याय मिळण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली जाणार आहे. पोलिसांना याबाबत माहिती देऊन कारवाई करण्यासाठी सांगितले जाईल.
डॉ. धनंजय जाधव,
तहसीलदार, कर्जत
तक्रार असलेली जमीन ही मालकीची असल्याने महसूल विभागाने याकडे पाहणे आवश्यक आहे. मात्र, त्याचवेळी होत असलेले अतिक्रमण आणि अनधिकृत कामासंदर्भात ग्रामसेवकांना लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सुशांत पाटील,
गटविकास अधिकारी, कर्जत पंचायत समिती