खानाव शाळेत यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव
। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील खानाव येथील रायगड जिल्हा परिषद शाळेतील शैक्षणिक, सांस्कृतिक, शालेय उपक्रम व स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील गुणवंत विद्यार्थी, विज्ञान प्रदर्शन प्रतिकृती, सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडा गायन व वक्तृत्व स्पर्धा यांमध्ये सहभागी व यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा बक्षिस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावर्षी आयोजित विविध स्पर्धा व उपक्रमात एकूण 103 विद्यार्थ्यांनी बक्षिसे व प्रमाणपत्रके मिळविली आहेत.
बक्षिस वितरणावेळी जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी संतोष शेडगे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्व सुविधा उपलब्ध असून, सर्व शिक्षक उच्चविद्याभूषित आहेत. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लक्ष दिले जाते. या शाळा सर्व सुविधायुक्त असून त्याचा लाभ विद्यार्थी व पालकांनी घेतला पाहिजे. ही केवळ शाळा नसून संस्कार केंद्र आहे, असे गौरवोद्गार संतोष शेडगे यांनी काढले आहेत.
दरम्यान, पारितोषिक वितरण समारंभाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रवींद्र थळे यांनी केले. त्यानंतर आर.सी.एफ पावर प्लांट इंजिनियर संजय धारिया यांनी ‘विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरमधील संधी’ याविषयी मार्गदर्शन केले. सुभाष पानसकर यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच, शाळेचे उपाध्यक्ष अभय म्हात्रे यांनी, वर्षभर राबविलेल्या उपक्रम व स्पर्धांमधील यशासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचा शाळेचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे म्हणत शुभेच्छा दिल्या.
यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी संतोष शेडगे, मुख्याध्यापक रवींद्र थळे, आरसीएफ थळ येथील जेष्ठ अधिकारी संजय धरिया, सुभाष पानसकर, शाळेचे अध्यक्ष दीपश्री टोपले, उपाध्यक्ष अभय म्हात्रे, संजीवनी थळे, नीलम बुरांडे आदींच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासोबत विविध बक्षिसे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.