म्हसळा भूमी अभिलेख कार्यालयातील पदे रिक्त

अधीक्षकांना करावी लागते कसरत
म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा भूमी अभिलेख कार्यालयात विविध पदांची संख्या 18 आहे त्यापैकी केवळ 7 पदे भरली असून तब्बल 11 पदे रिक्त असल्याची माहीती पुढे येत आहे. नव्याने अधिक्षक भूमी अभीलेख या रिक्त जागी आलेले वाय.जी.कातडे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार तळा येथील असल्याने त्यांना खरी कसरत करावी लागत आहे.
कातडे हे अनुभवी असल्याने तालुक्यातील लॉकडाऊनमुळे गेली दोन वर्षे रखडलेली कामे त्यांच्या कुशल नेतृत्वाने पूर्णत्वाकडे नेण्याचे काम त्यांचे कार्यालयीन सहकारी करीत आहेत. भूमीअभिलेख कार्यालयात निमतानदार 2, छाननी लिपिक 1, दुरुस्ती लिपीक 1, कनिष्ठ लिपीक 1, भूकर मापक 1, न.भू.लिपीक 1, प्रति लिपिक 1, दप्तर वबंद 1, शिपाई 3 अशी तब्बल 11 पदे रिक्त आहेत. अपुर्‍या कार्यालयीन कर्मचार्‍यांमुळे म्हसळा शहर व तालुक्यातील नागरिकांची शेतजमीन, प्लॉट मोजणीची कामे काही काळ खोळंबली असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. तसेच ग्रामीण उतारे, चतु:सीमा, फेरफार प्रकरणे, उतारे देणे, वारस लावणे, प्रॉपर्टी कार्ड काढणे आदी कामांसाठी नागरिकाना वारंवार चकरा माराव्या लागत असल्याने आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
तालुक्यातील आंबेत खाडीपट्टा भागातील नागरिकाना येण्या-जाण्याच्या सुविधा पुरेशा नसल्याने आणि ते अधिक खर्चिक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.स्थानिक लोकप्रतिनिधी व भूमी अभिलेख विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी याबाबत तात्काळ दखल घेऊन या कार्यालयातील रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी जनतेकडून होत आहे.

Exit mobile version