पोलादपूर नगरपंचायतला रिक्तपदांचे ग्रहण

। पोलादपूर । प्रतिनिधी ।

पोलादपूर नगरपंचायत कर्मचार्‍यांचा आकृतिबंध निव्वळ कागदावर दाखविण्यासाठी बनविल्याचे चित्र आहे. नगरपंचायतीमध्ये मंजूर असणारी पदे आकृतीबंधानुसार भरली गेली नसल्याने पोलादपूर नगरपंचायतीला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. आजमितीला नगरसेवक अधिक आणि कर्मचारी कमी अशी परिस्थिती असून गेली नऊ वर्षे कर्मचारी भरती झाली नसल्याने असणार्‍या कर्मचार्‍यांवर कामाचा अधिक ताण पडत आहे.

ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर बोटावर मोजण्याइतक्या कर्मचार्‍यांचे नगरपंचायतीमध्ये समावेशन करण्यात आले. परंतु तब्बल सहा ग्रामपंचायतीच्या कर्मचार्‍यांचे नगरपंचायतीमध्ये समावेशन करण्यात आले नसल्याने हे कर्मचारी लाभाविनाच निवृत्त होत आहेत.आजमितीला पोलादपूर नगरपंचायतीमध्ये 20 विविध विभागातील कर्मचार्‍यांची पदे रिक्त आहेत. पोलादपूर ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाल्यानंतर समावेशनाविना आतापर्यंत तीन कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत.

पोलादपूर नगरपंचायतीमध्ये आकृतीबंधानुसार रिक्त मंजूर पदांची भरती अद्याप झाली नसताना दुसरीकडे ग्रामपंचायतीचा जुना कर्मचारीवर्ग समावेशाअभावी केवळ पूर्वीच्याच पगारावर काम करीत असल्याचे दिसून आले आहे. परिणामी, अनुभवी कर्मचार्‍यांना अर्धबेकारी पत्करावी लागली आहे. पोलादपूर ग्रामपंचायतीचे 1 मार्च 2014 रोजी नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले आहे. यानंतर राज्यसरकार संवर्ग सेवानिहाय पदसंख्या मंजूर करण्यात आली आहे. ब श्रेणीचे स्थापत्य व अभियांत्रिकी सेवा 1 पद मंजूर असूनही रिक्त आहे. क श्रेणीची लेखापाल व लेखापरिक्षक मंजूर पदे दोन असून 1 रिक्त आहे. करनिर्धारण व प्रशासकीय सेवा ब श्रेणीचे 1 पद आणि क श्रेणीचे 1 पद रिक्त आहे. विकास सेवा क श्रेणीचे 1 पद मंजूर असूनही ते रिक्त आहे. त्यामुळे या सर्व संदर्भ क्रमांक 1 पैकी 6 मंजूर पदांपैकी 3 पदे रिक्त असून 3 पदे भरलेली आहेत. राज्यस्तरीय संवर्गातील पदांव्यतिरिक्त लिपिक टंकलेखक 5 मंजूर पदांपैकी केवळ 1 पद भरले आहे तर उर्वरित स्वच्छता निरिक्षक 1 मंजूर पद, तारतंत्री वायरमन 1 मंजूर पद, गाळणीचालक व प्रयोगशाळा सहायक 2 मंजूर पदे, पंप ऑपरेटर विजतंत्री जोडारी 1 मंजूर पद अशा एकूण 10 मंजूर पदांपैकी 9 पदे रिक्त आहेत. मात्र, चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांची शिपाई, मुकादम आणि व्हाल्वमन ही तीन मंजूर पदे ग्रामपंचायतीच्या कर्मचार्‍यांच्या समावेशनामुळे भरली गेली आहेत.

पोलादपूर नगरपंचायतीमध्ये राज्यस्तरिय संवर्गातील 19 मंजूर पदांपैकी केवळ 7 पदे भरली गेली असून 50 टक्केपेक्षा कमी कर्मचारीवर्ग असताना नगरपंचायतीच्या विकासाचं गाडं चालविण्याची जबाबदारी पोलादपूरचे मुख्याधिकारी विराज लबडे यांनी गेल्या वर्षभरात हजर होत समर्थपणे पेलली आहे. मात्र, यामुळे नगरपंचायतीचे दैनंदिन कामकाजच व्यवस्थित सुरू ठेवण्याचा निकाराने प्रयत्न करता येत असल्याची भावना दिसून येत आहे. पोलादपूर नगरपंचायतीमध्ये नगरअभियंता हे पद रिक्त असल्याने महाड नगरपरिषदेचे अभियंता सुहास कांबळे हे कामकाज पाहात असून त्यांच्याकडे त्याव्यतिरिक्त 3 नगरपंचायतींची जबाबदारी असल्याने पोलादपूर नगरपंचायतीच्या बांधकाम परवानगी देणे व इतर बांधकामविषयक कामकाजाला खीळ बसली आहे. लिपिक टंकलेखक मंजूर 5 पदांपैकी 4 पदे रिक्त असल्याने बांधकाम विभाग, करविभाग, लेखाविभाग, आरोग्यविभाग आणि नळपाणीपुरवठा विभाग या विभागांची जबाबदारी एकाच लिपिकावर येत असून संबंधित विभागांच्या कामकाजातील समस्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. समावेशनाअभावी नगरपंचायतीचे कर्मचारी होऊ न शकलेले पोलादपूर ग्रामपंचायतीचे जुने अनुभवी कर्मचारी लिपिक गणपत मोरे, सफाई कर्मचारी जयश्री मोरे व आता पाणीपुरवठा कर्मचारी चंद्रकांत जगताप यांच्या सेवानिवृत्तीनंतर उर्वरित सहा कर्मचार्‍यांसाठी नगरपंचायत प्रशासन आणि राज्यकर्ते शासनाकडे पाठपुरावा करताना आकृतीबंधानुसार सर्व 12 रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे.

पोलादपूर नगरपंचायतीमध्ये आकृतीबंधानुसार 19 कर्मचारी असण्याची गरज स्पष्ट झाली आहे. यापैकी तीन कर्मचारी लिपिक रूपेश जाधव, शिपाई प्रमोद शिंदे आणि व्हॉल्वमन यशवंत मोरे यांचे पोलादपूर नगरपंचायतीमध्ये समावेशन करण्यात आले असून बाळा पार्टे, रमेश जगताप, वाहन चालक दिलीप पार्टे, सफाई कामगार निलेश मोरे, शालीनी सोनवणे आणि निकिता निकम या 6 कर्मचार्‍यांची अवस्था समावेशनाअभावी ग्रामपंचायतीचेही नाही आणि नगरपंचायतीचेही नाही अशा त्रिशंकू स्वरूपाची झाली आहे.
Exit mobile version