पशुवैद्यकीय दवाखाना रिक्त पदांचा वाडा

। श्रीवर्धन । वार्ताहर ।

37 लाखाच्या मान्यतेनुसार श्रीवर्धन तालुक्यातील रानवली येथे पशु वैद्यकीय दवाखान्याचे उद्घाटन झाले होते. श्रीवर्धन तालुक्यातील बहुतांश नागरिक पशुपालन करणारे असून चांगल्या सुविधा त्यांच्या गुरांसाठी हा पशु वैद्यकीय उपलब्ध झाल्याने पशुपालक आनंदित होते. आजच्या स्थितीत रानवली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 येथे सोळा पैकी फक्त चार पदे भरली गेली आहेत व बारा पदे रिक्त आहेत. यामुळे रानवली पशुवैद्यकीय दवाखाना रिक्त पदांचा वाडा बनला आहे.

रानवली येथील दवाखान्यासह श्रीवर्धन तालुक्यातील हरेश्‍वर, सायगाव, दिघी, बोर्लीपंचतन व दांडगुरी येथील पशु वैद्यकीय उपकेंद्र ही पशु वैद्यकीय दवाखान्यातील फक्त चार कर्मचारी सांभाळत आहेत. श्रीवर्धन तालुक्याची ओळख ही बागायती व शेती पुरक व्यवसायाने नटलेला प्रदेश अशी आहे. आज प्रत्येक बागायतदारानी आपल्या व्यवसायाला उपयुक्त अशी गुरढोर सांभाळली आहेत. बदलते हवामान, वातावरण ह्यामुळे पाळीव गुरढोरांना आजारपण येतेच. अनेकदा वाहनाच्या धडकेत किंवा गुराढोरांच्या झोंबीत ढोरे जखमी होतात.

श्रीवर्धन तालुक्यात पाळीव ढोरे आजारपणाने मृत्यूमुखी पडल्याच्या तुरळक घटना घडल्या आहेत. वाहनाच्या धडकेत ढोरे जखमी होतात. अनेकदा वेळेत उपचार न मिळाल्यामुळे ढोर मृत्यूमुखी पडणे किंवा ढोरांना कायमचे अपंगत्व ही येण्याच्या घटना तालुक्यात घडल्या आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील अनेक शेतकरी व बागायतदार रानवली येथे पशु वैद्यकीय दवाखाना सुरू झाल्यावर समाधानी झाले होते, परंतु रिक्त पदांची संख्या बघून निराश झाले आहेत.

सप्टेंबर महिन्यात रायगड जिल्ह्यात नऊ पशुधन विकास अधिकार्यांची नियुक्ती होत आहे. तसेच, जिल्ह्यात तीस पशुधन पर्यवेक्षकाची रिक्त पदे जुन महिना अखेरपर्यंत भरली जातील. यामुळे पशुपालकांची गैरसोय लवकर दुर होईल.

डॉ.शाम कदम, पशुसंवर्धन अधिकारी,
जिल्हा परिषद, अलिबाग

पशुसंवर्धन विभागाचा रिक्त पदांचा अहवाल

संवर्गपदनाममंजुर पदेरिक्त पदे
1पशुधन विकास अधिकारी0303
2पशुधन विकास अधिकारी0101
3सहाय्यक पशुधन विस्तार
अधिकारी
0101
4पशु पर्यवेक्षक0303
5व्रणोपचारक0200
6शिपाई0604
एकुण1612
Exit mobile version