सुट्टी संपली, शाळा सुरू झाली..

बाबा, ई-रिक्षा कधी सुरू होणार? शालेय विद्यार्थ्यांचा पालकांना सवाल

| माथेरान | वार्ताहर |

दिवाळीची सुट्टी संपून माथेरानमधील शाळा सुरू झाली आहे. दररोज चार ते पाच किलोमीटर पायपीट करणारे शालेय विद्यार्थी ई-रिक्षा कधी सुरू होणार, असा सवाल आपल्या पालकांना विचारीत आहेत. शालेय विद्यार्थी, दिव्यांग बांधव, ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध पर्यटक या सर्वांसाठी लाभदायक ठरलेली ई-रिक्षा कधी सुरू होणार, असा प्रश्न येथे स्थानिकांमधूनही विचारला जात आहे. मागील वर्षी 12 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने येथे माथेरानच्या लाल मातीत ई-रिक्षा सुरू करण्याची परवानगी दिली. त्यानंतर डिसेंबर ते मार्च अशा तीन महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर येथे पालिकेकडून सात ई-रिक्षा चालविण्यात आल्या. याचा सगळ्यात जास्त फायदा हा येथील शालेय विद्यार्थ्यांना झाला. त्यांची दररोजची चार ते पाच किलोमीटरची पायपीट थांबली. परंतु, तीन महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर ई-रिक्षा बंद करण्यात आल्या.तेव्हापासून अजूनपर्यंत या सात ई-रिक्षा पालिका आवारात धूळखात आहेत.

दिवाळी सुट्ट्या संपून शाळा सुरू झाली असून, विद्यार्थ्यांची पायपीट पुन्हा सुरू झाली आहे. सकाळच्या गारठ्यात लहान मुलांना दप्तराचे ओझे पाठीवर घेऊन चालत शाळेत जावे लागत आहे. मुलांना वाटत होते की, दिवाळी सुट्टीनंतर आपल्याला ई-रिक्षातून शाळेत जाता येईल. पण, या लहानग्यांची निराशा झाली असून, हे शालेय विद्यार्थी ई-रिक्षा कधी सुरू होणार, असा सवाल येथे पालकांना विचारत आहेत.

सेंट झेव्हीयर हायस्कूल ही शाळा खूप लांब आहे. लहान मुलांना दप्तराचे ओझे घेऊन शाळेत जाताना खूप दमछाक होते. तीन महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर ई-रिक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा झाला होता. तरी, या ई-रिक्षा लवकर सुरू करण्यात याव्यात.

प्रमोद पार्टे, पालक
Exit mobile version