कोव्हॅक्सिन, फायझरची चाचणी अंतिम टप्प्यात
। नवी । दिल्ली । वृत्तसंस्था ।
कोरोनाच्या तिसर्या संभाव्य लाटेत लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेता त्या पार्श्वभूमीवर, दिल्ली, नागपूर तसेच इतर राज्यांत लहान मुलांवर सुरू असलेली कोव्हॅक्सिन, फायझर आणि जायडस-कॅडिला यांच्या लसीची मानवी चाचणी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे देशभरात सप्टेंबरपासून मुलांना लस देण्यास सुरुवात होईल, असा विश्वास एम्सचे वार्ंकग गूपचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी व्यक्त केला आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने 16 जानेवारीपासून देशभरात लसीकरण सुरू केले. यात पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवक आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, दुसऱया टप्प्यात 45 ते 59 आणि 60 पुढील ज्येष्ठ नागरिक यांचे लसीकरण सुरू आहे तर आता तिसऱया टप्प्यात 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू आहे. आता 18 वर्षांपर्यंतच्या मुलांचे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी काही राज्यांमध्ये मानवी चाचणी अंतिम टप्प्यात आहे.18 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी लस उपलब्ध होणे ही लसीकरणातील एक महत्त्वाची गोष्ट ठरणार आहे. 18 वर्षांपर्यंतच्या मुलांचे लसीकरण झाले तर शाळा पुन्हा सुरू करणे आणि सार्वजनिक ठिकाणे पुन्हा सर्वांसाठी खुली करणे शक्य होणार आहे, असे एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले.
जायडस कॅडिलाची चाचणी अंतिम टप्प्यात असून जुलैअखेरीला किंवा सप्टेंबरपासून 12 ते 18 वर्षांपर्यंतच्या मुलांना लस देणे सुरू होईल. ही लस वृद्ध आणि मुलांवरही परिणामकारक असल्याचा दावा कंपनीने केला आहे.भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचे मुलांवर सुरू असलेल्या चाचणीच्या दुसर्या आणि तिसर्या टप्प्याच्या चाचणीचे निष्कर्ष सप्टेंबरपर्यंत हाती येणार आहेत. त्यामुळे ही लसही सप्टेंबरपासून देणे सुरू होईल.