रायगडात मुलांची लसीकरण मोहीम सुरु

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण मोहीम बुधवारी (16 मार्च) अलिबाग नगरपरिषद शाळेमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा सामान्य रुग्णालय निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन गुंजकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी नगरपरिषद शालेय शिकणार्‍या विद्यार्थ्यांना कोर्बेवॅक्स या कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले.
कोरोनाची तिसरी लाट ओसरली असली तरी पुढील काळात कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना डोस देण्याची मोहिम हाती घेतली आहे. त्यानुसार बुधवारपासून रायगड जिल्ह्यात 12 ते 14 वयोगटातील लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली.
यावेळी अलिबाग नगरपरिषदेच्या सर्व 6 शाळांमधील स्वाती भुसाळे, संतोष आंबेतकर, प्रमिला म्हात्रे, सबिहा चिवीचकर, रफीका हळदेणकर, अनघा पाटील, ज्योती घरत यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यात 12 ते 14 वयोगटातील 1 लाख 40 हजार 500 मुले असून, या सर्वांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. विशेषत: ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व शाळा यांच्या समन्वयाने शाळांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. 12 ते 14 वयोगटातील सर्व मुलांनी लसीचा डोस घ्यावा. – डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड

Exit mobile version