। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
15 ते 18 वर्षांपर्यंतच्या मुलांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण 3 जानेवारीपासून सुरू करण्यात आले. जानेवारी ते 17 जानेवारी या 15 दिवसांत रायगड जिल्ह्यातील 63 हजार 671 मुलांनी लसीचा डोस घेतला असून, उर्वरित मुलांनी लवकरच लसीचा डोस घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. तसेच ग्रामीण भागातील मुलांचे 100 टक्के लसीकरण करण्यासाठी ठिकठिकाणी शिबीरांचे आयोजन करावे, असे निर्देशही त्यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेला दिले आहेत.
रायगड जिल्ह्यात सुरुवातीपासूनच कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम जोमाने राबविण्यात आली. सध्या मुलांना कोरोना विषाणू संसर्ग धोखा लक्षात घेता 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण शासनाने हाती घेतले आहे. रायगड जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील 1 लाख 46 हजार 860 मुले असून, त्यामधील 43.35 टक्के म्हणजे 63 हजार 671 मुलांनी लसीचा डोस घेतला आहे. कोरोना विषाणू संरर्गाचे रुग्ण जिल्ह्यात मोठ्या संख्येने सापडत आहेत. मात्र ज्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस घेतले आहेत, त्यांच्यात रोगप्रतिकार शक्ती निर्माण झाल्याने त्यांना कमी धोका निर्माण होत असल्याचे दिसून येते. यामुळे सर्व लाभार्थ्यांनी लसीकरण पूर्ण करून घ्यावे, तसेच तोंडाला मास्क लावणे, वारंवार हात स्वच्छ धुणे, सामाजिक अंतर बाळगणे याचे काटेकोर पालन करावे, कोरोनाची लक्षणे आढल्ल्यास तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
8 हजार 532 जणांनी घेतला बूस्टर डोस
आरोग्य सेवक, फ्रंटलाईन वर्कर्स, 60 वर्षांवरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना प्रिकॉशन डोस देण्यास 10 जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली आहे. 10 जानेवारी ते 17 जानेवारी या आठ दिवसांमध्ये जिल्ह्यातील 8 हजार 532 लाभार्थ्यांनी प्रिकॉशन डोस घेतला आहे.
जिल्ह्यात आत्तापर्यंत 22 लाख 538 जणांनी घेतली कोरोना लस
रायगड जिल्ह्यात 15 वर्षांवरील 23 लाख 39 हजार 360 लाभार्थी आहेत. यामधील 22 लाख 538 जणांनी कोरोना लसीचा डोस घेतला असून, यापैकी 17 लाख 19 हजार 645 जणांनी लसीचे दोनही डोस घेतले आहेत. तर 8 हजार 532 जणांनी प्रिकॉशन डोस घेतला असून, जिल्ह्यात एकूण 39 लाख 28 हजार 715 डोस देण्यात आले आहेत. तर 1 लाख 38 हजार 822 जणांनी अद्यापपर्यंत लसीचा एकही डोस घेतलेला नाही.