लसीकरण संघर्ष समितीच्या प्रयत्नांना यश
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत नगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांची कोविड लसीकरणासाठी होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन कर्जत शहरातील नागरिकांसाठी प्रत्येक प्रभागात लसीकरण व्हावे यासाठी लसीकरण संघर्ष समिती प्रयत्न करीत होती. त्यामुळे कर्जत शहरातील नागरिकांसाठी उपजिल्हा रुग्णालय आणि कर्जत नगरपरिषद यांच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात लसीकरण शिबीर आयोजित केली जात असून गणेशोत्सव काळात लसीकरण महोत्सव साजरा होत आहे.
कर्जत शहरातील प्रत्येक प्रभागात लसीकरण व्हावे यासाठी उपजिल्हा रुग्णालयाला लसीकरणचे कर्जत तालुक्याचे नोडल ऑफिसर असलेले तहसीलदार यांची परवानगी आवशयक असल्याचे माहिती लसीकरण संघर्ष समितीला मिळाली आणि मग लसीकरण संघर्ष समितीने पुन्हा एकदा कर्जत तहसिल कार्यालय गाठले. तेथे कर्जत शहरात पालिका लसीकरण केंद्र उघडून शहरातील सर्व नागरिकांचे लसीकरण करून घेण्यासाठी तयार असल्याचे सांगितले.
परंतु कर्जत उपजिल्हा रुग्णालय मधील कंत्राटी पद्धतीने काम करणार्या आरोग्यसेविका यांच्या सेवा शासनाने खंडित केल्याने शहरातील प्रत्येक प्रभागात आणि उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण करण्यावर परीणाम झाला आहे याची कल्पना तहसीलदार यांना वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडून देण्यात आली. त्यावेळी नागरिकांची मागणी आणि लसीकरणाची गरज लक्षात घेऊन उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.मनोज बनसोडे यांनी आपल्या सर्व आरोग्यसेविका आणि आरोग्य कर्मचारी यांना विश्वासात घेऊन ऐन गणेशोत्सव काळात लसीकरण महोत्सव साजरा करण्यासाठी तयारी दाखवली आणि लसीकरण महोत्सव साजरा होत आहे.