मधुशेठ ठाकूर चॅरीटेबल ट्रस्‍टतर्फे 1 हजार 118 ग्रामस्थांचे लसीकरण

कोरोना लसींच्‍या तुडवडयामुळे अनेक ठिकाणी लसीकरण मोहीम थंडावली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरीकांना तासनतास रांगेत उभं राहूनदेखील लस मिळत नाही. दुसरीकडे विकत लस टोचून घेणे गावातील गोरगरीबांना परवडणारे नाही. यावर रायगड जिल्‍हयातील सामाजिक संस्‍थांनी खास मोहीम हाती घेतली आहे. अलिबाग तालुक्‍यात सातिर्जे इथं मधुशेठ ठाकूर चॅरीटेबल ट्रस्‍टतर्फे गावातील नागरीकांचे लसीकरण करण्‍यात आले.

मुंबईतील नामवंत रूग्‍णालयांची मदत घेत सामाजिक संस्‍थांच्‍या सहकार्याने 18 वर्षावरील ग्रामस्‍थांचे लसीकरण केले जात आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असून लोकांनी लस टोचून घेण्‍यासाठी रांगा लावल्‍या होत्‍या . 1118 ग्रामस्‍थांनी याचा लाभ घेतला .

सातिर्जे येथे श्री मधुशेठ ठाकूर चॅरीटेबल ट्रस्‍टतर्फे मंगल कार्यालयात आयोजीत उपक्रमाला मुंबईतील रोटरी क्‍लब आणि पॉलसन कंपनीच्‍या सहकार्याने लसीकरण मोहीम राबवण्‍यात आली . मुंबईतील ब्रीचकॅन्‍डी रूग्‍णालयातील डॉक्‍टर्स आणि कर्मचारी यांनी या मोहीमेत महत्‍वाची भूमिका पार पाडली. ट्रस्‍टचे अध्‍यक्ष राजेंद्र ठाकूर यांनी सर्व व्‍यवस्‍थेत कोणतीही कसूर सोडली नव्‍हती . या मोहिमेला लाभार्थ्‍यांचा चांगला प्रतिसाद लाभला. यावेळी रोटरी क्‍लबच्‍या पूर्ना मेहता व इतर सदस्‍य उपस्थित होते.

Exit mobile version