। नागोठणे । वार्ताहर ।
जिल्ह्यातील आदिवासी बांधवांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास काहीशी उदासीनता दिसून येत आहे. असे असतानाच नागोठण्याजवळील कोंडगाव (ता.रोहा) ग्रामपंचायत हद्दितील आदिवासी वाड्यांमधील आदिवासी बांधवांना लसीकरण करण्याची महत्वाची कामगिरी कोंडगाव ग्रामपंचायतीने नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने केली आहे.
कोंडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने कोंडगाव येथील राजिप प्राथमिक शाळेच्या इमारतीत गुरुवारी (दि.23) नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत कोंडगाव ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी बांधवांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबविण्यात आली. यामध्ये 125 आदिवासी बांधवाचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.
यावेळी कोंडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच कमल बुरूमकर, उपसरपंच अनंत वाघ, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य निखिल मढवी, ग्रामसेविका विद्या घरत, नागोठणे आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रुती मोरे, आरोग्य सेवक वंदन तांबोली, जगदीश मोरे, निलीमा जाधव, जगदीश मोरे, रुग्णवाहिका चालक आल्हाद पिंगळे, आशासेविका चित्रा मढवी, प्रीती बुरूमकर आदींसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.







