44 वयाच्या खालील नागरिकांना डोस मिळेना
लस सुरू करावी; कार्यकर्ते सचिन गायकवाड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पनवेल । वार्ताहर ।
देशातील 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र लस उपलब्ध नसल्याने या वयोगटाला डोस दिला जात नाही. त्यामुळे या संकटात त्यांच्या जीविताला एक प्रकारे धोका निर्माण झाला आहे. त्यांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्वरित लस देण्यात यावी याबाबत व्यवस्था करावी अशी महत्वपूर्ण मागणी कामोठे येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन गायकवाड यांनी राज्य सरकारकडे केली आहे. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देऊन वास्तव विशद केले आहे.
कोरोना नियंत्रणाकरीता कोविड प्रतिबंधात्मक लस हा एकमेव उपाय आहे. त्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून लसीकरणास सुरूवात झाली आहे. सुरूवातीला ज्येष्ठ नागरिकांना याबाबत प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर ही मर्यादा 44 वर्षापर्यंत करण्यात आली. दरम्यान लसीचा पुरवठा होत नसल्याने महाराष्ट्रात 18 वर्षे वयोगटातील पुढील व्यक्तींना लस दिली जात नाही. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सुद्धा ही घोषणा फक्त नावापुरतीच आहे की काय असा प्रश्न तरुणांना पडलेला आहे. दरम्यान याबाबत सामाजिक कार्यकर्ते सचिन गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे. पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात लसीकरण मोहिम सुरू आहे. शासनाच्या निर्देशानुसार 1 मे पासून 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले होते. परंतु सद्यस्थितीत सदरचे लसीकरण बंद आहे. लस नसल्याचे कारण पुढे करून या वयोगटातील व्यक्तींना लस देण्यात येत नाही. सद्यस्थितीत लसींचा पुरवठा नियमित असून या अंतर्गत वय वर्षे 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केल्यास लसीकरणाचे उद्दिष्ट देखील लवकरात लवकर साध्य होईल असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.